नाशिक :- येथे सुरू झालेल्या महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या राज्यस्तरीय १९ वर्षांखालील वयोगटातील आमंत्रितांच्या क्रिकेट स्पर्धेच्या (एम सी ए इन्विटेशन लीग) दोन दिवसीय कसोटी सामन्यात नाशिकने नंदुरबारवर १ डाव व ३७ धावांनी मोठा विजय मिळविला.

हा विजय मिळविण्यात नाशिकचा डावखुरा सलामीवीर साहिल पारख व प्रतीक तिवारी यांचा सिंहाचा वाटा होता. सामन्यातील साहिलने 155 धावा तर प्रतीक तिवारीने ९ बळी मिळविले. या विजयात कर्णधार आयुश ठक्कर च्या ८३ धावा व नीलकंठ तनपुरे च्या एकूण ४ बळींनी ही मोलाचा वाटा उचलला. हुतात्मा अनंत कान्हेरे मैदान, गोल्फ क्लबवर नंदुरबारने नाणेफेक जिंकुन प्रथम फलंदाजी केली. नीलकंठ तनपुरेने सलामीवीरांना बाद केल्यानंतर प्रतीक तिवारी ने ५ गडी बाद केले व नंदुरबारला ५२.२ षटकांत १७७ धावात रोखले. नीलकंठ तनपुरेने वरच्या फळीतील ३ तर रोहन शेडगे व अथर्व चौधरीने ही प्रत्येकी १ गडी बाद केला.

उत्तरादाखल साहिल पारखने २० चौकार व ४ षटकारांसह १३० चेंडूत खणखणीत १५५ धावा ठोकल्या. त्यामुळे पहिल्या दिवस अखेरच नाशिकने ३४ षटकांत ४ बाद २३३ अशी नंदुरबारवर ५६ धावांनी आघाडी घेतली होती. दुसर्या दिवशी २५ षटकांत १३४ भर घातली, ती कर्णधार आयुश ठक्करच्या ८३ धावांमुळे. नाशिकने १९० धावांची आघाडी घेऊन डाव घोषित केला. नंदुरबारला दुसर्या डावात ४४.४ षटकांत १५३ धावांत सर्वबाद करून , नाशिकने हा विजय मिळविला.
संक्षिप्त धावफलक व निकाल :
नंदुरबार विरुद्ध नाशिक :
नंदुरबार पहिला डाव – सर्वबाद १७७ – तन्मय शाह ३७, ओंकार काळे ३६. प्रतीक तिवारी ५, नीलकंठ तनपुरे ३ तर रोहन शेडगे व अथर्व चौधरी प्रत्येकी १ बळी .
नाशिक पहिला डाव – ७ बाद ३६७ साहिल पारख १५५ , आयुश ठक्कर ८३. तन्मय शाह व ओंकार काळे प्रत्येकी २ बळी .
नंदुरबार दुसरा डाव – सर्वबाद १५३ – तनवीर सिंग ४९. प्रतीक तिवारी ४,अथर्व चौधरी ३,गुरमान सिंग रेणु २ व नीलकंठ तनपुरे १ बळी .
नाशिक १ डाव व ३७ धावांनी विजयी.