नाशिकरोड (प्रतिनिधी) :- एकलहरा रोडवरील उसाच्या मळ्यात मृतावस्थेत आढळलेल्या महिलेची ओळख पटली असून, या घटनेचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे.
पूजा विजय सूर्यवंशी (वय 25, रा. टाकळी रोड, उपनगर) असे मृतावस्थेत आढळलेल्या महिलेचे नाव आहे. पूजा ही दि. 2 जुलै रोजी दुपारी 2 च्या सुमारास कामाला जाते, असे घरात सांगून गेली होती; मात्र ती उशिरापर्यंत घरी परतली नाही. त्यानंतर दि. 5 जुलै रोजी एकलहरा रोडवर सोमनाथ जाधव यांच्या उसाच्या शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी हा मृतदेह वैद्यकीय चाचणी करण्यासाठी पाठविला होता. त्याचा अहवाल प्राप्त झाला असून, त्यात खून, अतिप्रसंग असा कुठलाही प्रकार नसल्याचे निष्पन्न झाले आहे.
या मृतदेहाची ओळख पटविण्याचे आवाहन असताना त्यादरम्यान पूजा सूर्यवंशी हिच्या घरची मंडळी पोलीस ठाण्यात आली असता तिची ओळख पटली आहे, तसेच मृत पूजा सूर्यवंशी हिच्या मोबाईलवरून आलेल्या फोन रेकॉर्डची तपासणी पोलीस करीत असून, याबाबत पोलीस अधिक तपास करीत आहेत, अशी माहिती नाशिकरोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली.