नाशिकचा रणजीपटू सत्यजित बच्छाव आयपीएल लिलाव यादीत

नाशिक (प्रतिनिधी) :- नाशिकचा रणजीपटु सत्यजित बच्छाव याची बीसीसीआय तर्फे आयोजित येत्या आयपीएलसाठीच्या लिलाव यादीत निवड आली आहे. १२ व १३ फेब्रुवारी रोजी बंगळुरू येथे आयपीएल हंगामासाठी हा महालिलाव होणार आहे.

३७० भारतीय खेळाडुंसह, १४ सहयोगी देशातील २२० मिळून, एकुण ५९० क्रिकेटपटूंवर यात बोली लागणार आहे. दहा संघांनी खेळाडुंची पसंती दर्शवल्यानंतर गेल्या महिन्यात जारी करण्यात आलेली आधीची १२१४ खेळाडुंची यादी कमी झाली.
मागील दोन, तीन रणजी हंगामात केलेल्या उत्कृष्ट, सातत्यपुर्ण कामगिरीच्या जोरावर सत्यजित हा महाराष्ट्र संघाचा महत्त्वाचा गोलंदाज झालेला आहे.

यंदाच्या हंगामात नोव्हेंबर महिन्यात झालेल्या सय्यद मुश्ताक अली टी-ट्वेंटी स्पर्धेत, लखनौ येथे एलिट ए गटातील सामन्यांत सत्यजितने ६ सामन्यात २२ षटकांत ७ बळी घेतले. स्पर्धेत गोवा व पुदुचेरी संघांविरुद्ध अनुक्रमे ३ व २ बळी घेऊन महाराष्ट्र संघाच्या मोठ्या विजयांत महत्वाचा वाटा उचलला. प्रथम श्रेणी सामन्यांत, महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करतांना सत्यजितने आतापर्यंत २३ सामन्यांत ७८ बळी घेतले आहेत. यात एका डावात ५ बळी घेण्याचा पराक्रम दोनदा, तर पाच वेळा ४ गडी बाद करण्याची जोरदार कामगिरी नाशिकच्या या डावखुर्‍या फिरकीपटुने केली आहे. त्याबरोबरच खालच्या फळीतील आक्रमक फलंदाजीने देखील संघाच्या धावसंख्येत वेळोवेळी आपला वाटा उचलत असतो. आतापर्यंत ६७ सर्वोच्च धावसंख्येसह तीन अर्धशतके झळकावली आहेत.

अशा लक्षणीय कामगिरीमुळेच नाशिकचे क्रिकेट विश्व सत्यजित बच्छावला शुभेच्छा देत, आयपीएल महालिलावाची अपेक्षेसह आतुरतेने वाट पाहत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!