नाशिकरोड | चंद्रकांत बर्वे : येथील भरचौकात व नाशिकरोड पोलिस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या बिटको चौकातील एका मोबाईल विक्रीच्या दुकानात पहाटेच्या सुमारास धाडसी चोरी झाली असून सुमारे तीस ते चाळीस लाखांच्या मोबाईलवर चोरट्यांनी डल्ला मारल्याचे माहिती समोर आली असून या प्रकरणी नाशिकरोड पोलीसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नाशिकरोड येथील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या बिटको चौकात व पोलिस ठाण्याच्या हाकेचे अंतरावर रवी रामनानी यांचे तेली पॅथी कम्युनिकेशन नावाचे मोबाईल विक्रीचे मोठे दालन आहे. अनेक मोबाईल कंपनीचे वेगवेगळ्या प्रकारचे मोबाईल विक्रीस असल्याने शहरभरात हे दालन प्रसिद्ध आहे. आज पहाटेच्या सुमारास काही अज्ञात चोरट्यांनी या दालनाचे शटरचे कुलूप असलेल्या भागातील कडी तोडून जवळपास 100ते 125 मोबाईल चोरून नेले. चोरट्यानी या दालनातील केवळ महागडे मोबाईल चोरून नेले असून दहा हजारा खालील एकाही मोबाईलला चोरट्याने हात लावलेला नाही.

दरम्यान सदर घटनेची माहिती मिळताच पोलिस उपायुक्त विजय खरात, साहाय्यक पोलीस आयुक्त डॉ सिद्धेश्वर धुमाळ, वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे, गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली व पाहाणी केली. तसेच या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात चोरीची तक्रार दाखल करण्याचे काम सुरू आहे.