नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : रेल्वेत सरकारी नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून दोन युवकांना 13 लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी सहा जणाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की आरोपी प्रकाश पाटील, संदीप उपासे, दयानंद उपासे (तिघेही रा. एकांबा, ता. औराद, जि. बिदर, कर्नाटक), निरांजन, मानसकुमार नाईक (नाव व पत्ता माहीत नाही) व एक अनोळखी इसम या सहा जणांनी फिर्यादी वैभव शिवाजी वाडकर (रा. शिवाजीनगर, सातपूर (मूळ रा. सोनारवाडी, मु. पो. डिगळ, जि. लातूर) व त्याचा मित्र राहुल भीमराव बालुरे यांच्याशी संपर्क साधला. त्यांना या सहा जणांनी विश्वासात घेऊन तुम्हाला रेल्वेत नोकरी लावून देतो, असे आमिष दाखविले. त्यानुसार या दोन्ही युवकांचा या टोळक्याने विश्वास संपादन केला.
तसेच फिर्यादी वाडकर व त्याचा साक्षीदार बालुरे यांना आरोपींनी दि. 1 जून 2018 ते दि. 1 फेब्रुवारी 2021 या कालावधीत एकांबा, कोलकाता येथे, तसेच महात्मानगर, सिडको, नाशिक येथे बोलावून घेतले व त्यांच्याकडून खोटे फॉर्म भरून घेतले व भरतीची खोटी प्रक्रिया करून घेत ती खरी असल्याचे भासविले, तसेच फिर्यादी व साक्षीदार यांच्याकडून वेळोवेळी रोख स्वरूपात व नाशिक येथून अॅक्सिस बँकेचा धनादेश घेऊन सुमारे 13 लाख रुपये वेळोवेळी घेऊन फसवणूक केली, तसेच वाडकर व बालुरे या युवकांना खोटे अपॉईंटमेंट देऊन ते खरे असल्याचे भासवून वेळोवेळी आर्थिक फसवणूक केली.
दरम्यान, या दोन्ही युवकांनी या सहा संशयितांकडे वेळोवेळी नोकरीबाबत विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन तुमचे पैसे परत देतो, असे खोटे आश्वासन दिले. वरील आरोपींनी आजपर्यंत पैसे परत न देता दोन्ही युवकांची 13 लाख रुपयांना फसवणूक केल्याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शेंडकर करीत आहेत.