वृद्धेला भुरळ घालून 30 हजारांचे दागिने लंपास

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : दवाखान्यात जाणार्‍या एका वृद्ध महिलेला भुरळ घालून अज्ञात भामट्याने तिच्याजवळून 30 हजारांचे दागिने लंपास केल्याची घटना बागवानपुर्‍यात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी शकुंतला भिकाजी गायकवाड (रा. मोठा मातंगवाडा, महालक्ष्मी चाळीच्या पाठीमागे) ही 80 वर्षीय वृद्ध महिला बागवानपुरा येथे दवाखान्यात जात होती. त्यावेळी सिफा दवाखान्याच्या बाजूस बंद पडलेल्या रॉबिन बिस्कीट कारखान्याच्या पडीक जागेत पांढरा शर्ट घातलेल्या एका अनोळखी इसमाने वृद्धेला जवळ बोलावले. तिला भुरळ घालून नकळत तिच्या हातातील दहा हजार रुपये किमतीचे 50 भार वजनाचे दोन चांदीचे कडे, पाचशे रुपये किमतीच्या दोन चांदीच्या बांगड्या, पाच हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, दोन हजार रुपये किमतीची नाकातील सोन्याची मुरणी, पाच हजार रुपये किमतीची तीन ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी, तसेच सात हजार रुपये रोख, असा एकूण 29 हजार 500 रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला.

दरम्यान या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मोहिते करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!