नाशिक | प्रतिनिधी : जिल्ह्यामध्ये बिबट्याचा हल्ला हा सातत्याने सुरूच असून बिबट्याने काल रात्री केलेल्या हल्ल्यात गायत्री नवनाथ लिलके ही ६ वर्षीय चिमुकली मयत झाली आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. बिबट्याचा शोधही वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी सुरू केला आहे.
याबाबत वनविभागाच्या सूत्रांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, काल संध्याकाळी ८.३० वाजेच्या सुमारास त्र्यंबकेश्वर तालुक्यातील धोंडेगाव या परिसरात कुमारी गायत्री नवनाथ लिलके ही साडे सहा वर्षाची मुलगी घराबाहेर खेळत असताना अचानक बिबट्याने तिच्यावर हल्ला केला. यामध्ये ही मुलगी जागेवर मृत पावली.
दरम्यान तिच्या मामाकडे ही मुलगी राहण्यासाठी आली होती तिची आई संगीता नवनाथ लिलके हे घराबाहेर बसले होते परंतु त्यांना काही कळण्याच्या आतच बिबट्याने हल्ला करून गायत्रीला उचलून नेले आणि त्यामध्ये ती मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तातडीने वनविभागाचे अधिकारी दाखल झाले आणि त्यांनी या ठिकाणी पुढील कारवाई सुरू केली आहे.