नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : चेकवर खाडाखोड करून परस्पर वटवून एका इसमाची 85 हजार रुपयांना फसवणूक करणार्या अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी संदीप अशोक माळवे रा. कन्हैया सोसायटी, जेलरोड, नाशिक यांचे सैलानी बाबा स्टॉप येथे जय गणेश नावाचे किराणा दुकान आहे. या दुकानात 11 ऑक्टोबर रोजी सकाळी 11 वाजता एका पेपरचा अज्ञात जाहिरात प्रतिनिधी आला. त्याने फिर्यादी माळवे यांच्याकडून एका पेपरसाठी 444 रुपयांचा युनियन बँकेचा चेक घेतला. त्यावर अज्ञात इसमाने खाडाखोड करून तो दि. 2 नोव्हेंबर 2021 रोजी वटवून फिर्यादीच्या खात्यातून सुमारे 85 हजार रुपये शनीकुमार नावाच्या व्यक्तीच्या बँक खात्यात ट्रान्स्फर करून फिर्यादी माळवे यांची फसवणूक केली.

दरम्यान या प्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शेळके करीत आहेत.