नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : कोर्टातून केस मागे घेत नसल्याच्या कारणावरून सासर्यासह सुनेवर कोयत्याने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणार्या एका युवकाला अटक करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी स्वाती सुमेध वाघमारे (रा. संत कबीरनगर झोपडपट्टी, कॉलेज रोड, नाशिक) व त्यांचे सासरे विजय शशीराव वाघमारे हे 29 जानेवारी रोजी रात्री साडेआठ वाजता घराजवळ बसले होते. यावेळी आरोपी अमन दयाळ जाधव (वय 21, रा. संत कबीरनगर झोपडपट्टी) यांची आई स्वाती वाघमारे यांचे सासरे कोर्टातून केस मागे घेत नसल्याच्या कारणावरून बाचाबाची करीत होती. त्यावेळी आरोपी अमन याने हातात कोयता घेऊन जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने फिर्यादीच्या सासर्यावर कोयत्याचा वार करणार तेवढ्यात फिर्यादी महिला मध्ये पडली. त्यामध्ये तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. दुसरा वार सासर्याच्या डाव्या हातावर झाला. यात सून व सासरा गंभीर जखमी झाले आहेत.

दरम्यान या प्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात असून, आरोपी अमन जाधव याला पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बैसाणे करीत आहेत.