Home क्राईम जमीन नावावर करून फसवणूक केल्याप्रकरणी रम्मी राजपुतसह तिघांवर गुन्हा दाखल

जमीन नावावर करून फसवणूक केल्याप्रकरणी रम्मी राजपुतसह तिघांवर गुन्हा दाखल

0

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : जमिनीच्या सात-बारावर स्वत:चे नाव लावून फसवणूक केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी श्रीकांत मधुकर कुलकर्णी (रा. त्रिमूर्ती हाऊसिंग सोसायटी, समर्थनगर, कॉलेज रोड, नाशिक) व त्यांच्या भागीदारांची त्र्यंबकेश्‍वर शिवारातील सर्व्हे नंबर 211 क्षेत्र 1 हेक्टर 77 आर ही जमिनीचे मालक विष्णू नथू पालवे यांच्याकडून नोंदणीकृत खरेदी खताद्वारे विकत घेतलेली आहे, हे माहीत असतानाही आरोपी रम्मी राजपूत याने देखील जमिनीचे मालक विष्णू पालवे व त्यांच्या कुटुंबीयांना धमकावून हाताशी धरले व कुलकर्णी यांनी खरेदी केलेली जमीन हडपण्याच्या उद्देशाने आपसात संगनमत करून कट रचला व सन 2013 मध्ये नाशिकरोड येथील एका वकीलाच्या कार्यालयात दि. 8 एप्रिल 2010 रोजीचा मागील तारखेचा विष्णू पालवे यांच्यासोबत साठे खत करारनामा करून तो खरा असल्याचे भासवून त्याआधारे कुलकर्णी यांनी विकत घेतलेली जमीन पुन्हा दुय्यम निबंधक कार्यालय, त्र्यंबकेश्‍वर यांच्याकडे दि. 10 सप्टेंबर 2013 रोजीचा दस्त क्रमांक 1430/2013 अन्वये खरेदी खत दस्ताद्वारे स्वत:च्या नावावर खरेदी करून घेतली व जमिनीच्या सात-बारावर स्वत:चे नाव लावून कुलकर्णी व त्यांच्या भागीदारांची फसवणूक केली.

या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात आरोपी रम्मी राजपूत, विष्णू नथू पालवे यांच्यासह एका वकीलाविरोधात भा. दं. वि. कलम 420, 467, 465, 468, 471, 506, 34, 120 ईप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक माईनकर करीत आहेत.