नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : कंपनीत काम करणार्या कामगाराने कंपनीची महत्त्वाची माहिती स्वत:च्या ई-मेलवर घेऊन ग्राहकांना सेवा पुरवून फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी हे शिन्डलर इंडिया प्रा. लि. या कंपनीत व्यवस्थापक म्हणून काम पाहतात. आरोपी अमोल अशोकराव जाधव (मु. पो. अंबड, जि. जालना, ह. मु. कैलासनगर, नाशिक) याने कंपनीत नोकरी करीत असताना कंपनीची महत्त्वाची माहिती स्वत:च्या ई-मेलवर अनाधिकाराने बेकायदेशीररीत्या फॉरवर्ड केली. या माहितीच्या आधारे आरोपी जाधव याने स्वत:च्या फायद्याकरिता कंपनीच्या नावाखाली स्वत:ची कंपनी असल्याचे भासवून ग्राहकांना सेवा पुरविली व त्यातून पैसे मिळविले.

दरम्यान अशा पद्धतीने आरोपी जाधव याने तोतयेगिरी करून दि. 4 जानेवारी 2011 ते दि. 8 फेब्रुवारी 2021 या कालावधीत कंपनीची फसवणूक करून विश्वासघात केला म्हणून त्याच्याविरुद्ध सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक सूरज बिजली करीत आहेत.