नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : दारू पिण्यासाठी पैसे देण्यास नकार देणार्या तरुणाच्या डोक्यात तीन जणांनी कोयत्याने वार केल्याची घटना सातपूर येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी खंडू सुखदेव वाघ (वय 39, रा. आंबेडकर पुतळ्याजवळ, महादेववाडी, सातपूर) यांच्याकडे आरोपी रवी साळवे (रा. दुडगाव, ता. त्र्यंबकेश्वर), सोन्या व परश्या (पूर्ण नावे व पत्ते माहीत नाहीत) यांनी दारू पिण्यासाठी पैसे मागितले; मात्र फिर्यादीने पैसे देण्यास नकार दिला. त्याचा राग आल्याने तिघा आरोपींनी संगनमताने वाघ यांना हाताच्या चापटीने मारहाण केली, तर तिघांपैकी एकाने हातात असलेल्या लोखंडी कोयत्याने डोक्यात मारून गंभीर दुखापत केली.

दरम्यान या प्रकरणी सातपूर पोलीस ठाण्यात तिघा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सय्यद करीत आहेत.