नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : मेडिकल टाकण्यासाठी व चारचाकी वाहनासाठी माहेरून पैसे आणले नाहीत म्हणून विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीसह सासरच्या चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी सुनीता आधार पवार (रा. शिवनगर, वाडी रस्ता, मु. पो. बनोटी, जि. औरंगाबाद) यांची मुलगी ऊर्मिला विनोद शिंदे (वय 26) ही सन 2020 ते दि. 6 फेब्रुवारी 2022 दरम्यान तपोवन रोडवरील अनुसयानगर येथे वक्रतुंड हाईट्स इमारतीत असलेल्या सासरी नांदत होती. यादरम्यान पती विनोद शिंदे, सासू सुरेखा शिंदे, सासरे अशोक लोटन शिंदे व दीर प्रमोद अशोक शिंदे यांनी संगनमत करून विवाहितेचा छळ केला. पतीला मेडिकल टाकण्यासाठी व चारचाकी वाहन घेण्यासाठी माहेरून पैसे आणण्यासाठी विवाहितेकडे वेळोवेळी तगादा लावला.
दरम्यान वाईटसाईट शिवीगाळ करून घरातील किरकोळ कारणातून मारहाण, तसेच स्वयंपाक येत नाही म्हणून विवाहिता ऊर्मिला शिंदे हिचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केले म्हणून भद्रकाली पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पवार करीत आहेत.