नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : जिल्ह्यातील लोहोणेर येथे शुक्रवारी (दि.११) प्रेमप्रकरणातून प्रेयसी आणि तिच्या घरच्यांनी गाेरख बच्छाव या तरुणाला बेदम मारहाण करत जिवंत जाळले हाेते. या घटनेनंतर मुलाला नाशिकच्या (Nashik) जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. या प्रकरणी पोलिसांनी संशयित मुलीसह तिचे आई, वडील आणि भाऊ यांना ताब्यात घेतले होते. या सर्वांना शनिवारी (दि.१२) कळवण न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना १५ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

तर या घटनेतील युवक ८५ टक्के भाजल्याने उपचारादरम्यान जिल्हा शासकीय रुग्णालयात युवकाचा मध्यरात्री मृत्यू झाला. व्हॅलेंटाईन दिनीच या युवकाने अखेरचा श्वास घेतल्याने प्रेमादिनाला गालबोट लागले आहे. या घटनेने लोहोणेर गाव हादरले असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. शुक्रवारी रावळगाव येथील युवतीने तिच्या कुटुंबीयांसह लोहोणेर येथे येऊन आपला प्रियकर गोरख बच्छाव याच्याशी वाद घालत, त्याच्यावर पेट्रोल टाकून जाळण्याचा प्रयत्न केला होता.

या प्रकरणी पोलिसांनी कल्याणी गोकुळ सोनवणे हिच्यासह गोकुळ तोंगल सोनवणे, निर्मला गोकुळ सोनवणे, तसेच तिचे दोन्ही भाऊ हेमंत गोकुळ सोनवणे व प्रसाद गोकुळ सोनवणे (सर्व रा.बी. सेक्शन, रावळगाव) यांना ताब्यात घेतले होते. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला होता. गोरख बच्छाव (वय ३१) हा काही वर्षांपूर्वी रावळगाव ता.मालेगाव येथील सदर युवतीच्या संपर्कात आल्याने दोघांमध्ये प्रेम संबंध निर्माण झाले होते. मात्र, युवतीच्या घरच्यांनी तिचे दुसरीकडे लग्न निश्चित केले होते. सदर विवाह मोडल्याने तो गोरख यानेच मोडल्याचा संशय मुलीच्या घरच्यांना आला.
तसेच मुलीचे लग्न मोडल्याने मुलीसह तिचे कुटुंबीय लोहोणेर येथे आले. यावेळी गोरख याच्या डोक्यात लोखंडी सळईने वार करून, मुलीने त्याच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवून दिले, यात तो गंभीर जखमी झाला होता. घटना घडल्यानंतर संबंधित युवती व तिचे कुटुंबीय स्वतः पोलिसांत हजर झाले होते. त्यानंतर, देवळा पोलिसांनी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आज पहाटे गोरखचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.