नाशिकरोडला वाईन शॉपमधील नोकरांनी केला 40 लाखांचा अपहार

नाशिकरोड । भ्रमर वृत्तसेवा : दुकानातील विक्री केलेल्या मालाबाबत संगणकाच्या नोंदीमध्ये फेरफार करून तीन नोकरांनी सुमारे 40 लाखांचा अपहार करून मालकाची फसवणूक केल्याप्रकरणी नाशिकरोड पोलिसांनी दोघांना अटक केली असून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, फिर्यादी तरूण प्रितमदास सुखवानी (रा. प्राईड इस्टेट, बस स्टॉपजवळ, नाशिकरोड) हे सिन्नर फाटा येथे असलेल्या हिरा वाईन शॉपमध्ये मॅनेजर म्हणून काम पाहतात. या दुकानात अविनाश अनिल खैरनार (वय 25, रा. म्हसरूळ, नाशिक), मुसा अब्दुल शेख (वय 35, रा. एकलहरा रोड, सिन्नरफाटा) हे आठ ते दहा वर्षापासून शॉपमध्ये सेल्समन म्हणून काम पाहात होते. सेल्समन अविनाश खैरनार व मुसा शेख हे दररोजचा हिशोब पाहून त्यात आलेली रक्कम बँकेत भरण्याचे काम करत होते. तसेच दुकानाच्या दारुबंदी बाबतचे सर्व अकाऊंट योगेश आनंदा खाडे (रा. दत्तमंदिर, नाशिकरोड) हे महिन्याच्या दर आठवड्याला तपासणी करत होते. या दुकानात दोन संगणक असून, त्यात दारु विक्री करताना सर्व बाटल्यांचे स्कॅनिंग देखील तेच करत होते. तसेच संगणकामध्ये स्टॉक, मालाच्या विक्रीबाबतचा ताळेबंद, साठवणुकीचे काम देखील हे दोघेच पाहात होते. डिसेंबर 2020 च्या सुुरुवातीला दारुच्या बाटल्यांची झालेली विक्री व त्यांची आलेली रक्कम यात तफावत असल्याचे लक्षात आले. ही तफावत सुमारे 40 लाखांपेक्षा जास्त असल्याचे लक्षात आल्याने सुखवानी व त्यांचा सीए आणि अकाऊंटची तपासणी करणारे ऑडिटर योगेश खाडे यांना याबाबत तपासणी करण्यास सांगितले. त्यांना देखील सुरुवातीला यामध्ये घोळ झाल्याचे लक्षात आले नाही.

परंतु दोन्ही संगणकांवरील माहितीची जुळवाजवळ करून पडताळणी केली असता. सेल्समन अविनाश खैरनार व मुसा शेख यांनी ही फसवणूक केल्याचे लक्षात आले. अधिक चौकशी केली असता सेल्समन अविनाश खैरनार व मुसा शेख यांनी दि.1 जुलै 2018 ते 30 नोव्हेंबर 2020 या कालावधीत अफरातफर केल्याचे समोर आले. या दोघांनी प्रथम 1 हजार 56 रुपयांचा पहिला घोटाळा केल्यानंतर वेळोवेळी संगणकावरील हिशोबात घोळ केला. खैरनार व शेख रोजचा हिशोब देत असताना स्कॅनिंग होत असलेल्या दोन संगणकाचा प्रत्यक्ष मालाचा खप व त्यातून येणार्‍या किंमतीपेक्षा कमी रक्कम हाताने दाखवून किंमतीमध्ये बदल केले. व त्याबाबतचे वेगवेगळे स्टेटमेंट मॅनेजर सुखवानी यांना दाखवून त्यांची फसवणूक करत होते. त्याचप्रमाणे नोंदीमध्ये फेरफार करुन खोटे कागदपत्र तयार करुन ते खरे असल्याचे भासवून एकूण 40 लाख 8 हजार 483 रुपयांचा अपहार करुन त्यात मिळालेल्या रकमेपैकी श्रीमती अनिता अनिल खैरनार (रा. शांतीनगर, रामकृष्णनगर, नाशिक) यांच्या गृहकर्जाचे हप्ते मुदतपूर्व भरणा करुन मालकाची फसवणूक केली. ही बाब लक्षात आल्यानंतर तरुण सुखवानी यांनी नाशिकरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल करून अविनाश खैरनार व मुसा शेख या दोन सेल्समनला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक पाटील करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!