नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : किरकोळ कारणातून झालेल्या वादात दोन गटांमध्ये हाणामारीची घटना घडली. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी केतन गणेश भावसार (रा. साईबाबानगर, महाकाली चौक, सिडको) याने पहिली फिर्याद दिली आहे. आरोपी राम सूर्यवंशी याने प्रणव हिरे यास काल फिर्यादीच्या घराजवळ मला का शिव्या देत होतास, या कारणावरून त्याच्या हातात असलेल्या चाकूने प्रणवच्या डोक्याला व पाठीवर वार केले, तसेच केतन भावसार याला “तू याच्यासोबत का आलास?” असे म्हणत फिर्यादीच्या डाव्या हाताच्या कोपर्यावर वार करून गंभीर जखमी केले.
तर दुसरी फिर्याद सुमन अशोक सूर्यवंशी रा. शुभम् पार्क, भोळे मंगल कार्यालयामागे यांनी दिली आहे. त्यात म्हटले आहे, की आरोपी प्रणव हिरे, अविनाश शिवाजी गायकवाड (रा. शुभम् पार्क, सिडको), वैभव रणजित लोखंडे (वय 20, रा. स्वामीनगर, अंबड), ओम्या खटकी (वय 18), केतन भावसार (वय 20, रा. राजरत्ननगर, सिडको), सोनू खिरकाडे (वय 29, रा. पंचवटी) यांच्यासोबत झालेल्या भांडणाची कुरापत काढून या आरोपींनी फिर्यादी सूर्यवंशी यांच्या दुकानात काम करणार्या प्रमोद बोरकर यास मारहाण करून दुकानाची तोडफोड केली.
तसेच रस्त्यावर असलेल्या दुकान व गाड्यांची तोडफोड करून नुकसान केले व त्यांच्याकडील हत्यार हवेत फिरवीत “कोणीही पुढे आला, तर त्याचा गेम करून टाकू,” अशी धमकी देत परिसरात दहशत निर्माण केली. म्हणून अंबड पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारींनुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अनुक्रमे पोलीस नाईक बनतोडे व पोलीस उपनिरीक्षक शेख करीत आहेत.
