नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : मोरवाडी मनपा दवाखान्यातील वैद्यकीय अधिकारी डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या त्यांचेच पती संदीप वाजे यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी दिली. या प्रकरणात अजून सहा ते सात आरोपी असल्याचे देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे गेल्या चार दिवसांपासून याबाबत होत असलेल्या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.

डॉ. सुवर्णा वाजे यांची कार जळालेल्या अवस्थेत दि. 26 जानेवारी रोजी वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत मिळाली होती या घटनेमुळे खळबळ उडाली होती. याबाबत पोलिसांनी अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. पण त्याच दिवशी रात्री अडीच वाजता त्या बेपत्ता असल्याची तक्रार कुटुंबीयांनी नोंदविली होती. मात्र मयत डॉ. सुवर्णा वाजे यांची हाडे जळालेल्या अवस्थेत कारमध्येच मिळाली होती. परंतु ही हाडे त्यांचीच आहेत, याची पुष्टी करणारा डीएनए अहवाल पोलिसांना अपेक्षित होता. तो मिळाल्यानंतर तपासाची चक्र फिरली आणि पोलिसांनी पती संदीप वाजे यांना चौकशीसाठी ताब्यात घेतले.
त्यावेळी त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून अधिक तपास सुरु आहे असे सांगून पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी सांगितले की, प्रथम डॉ. सुवर्णा वाजे यांची हत्या करण्यात आली त्यानंतर त्याचा मृतदेह गाडीमध्ये ठेऊन गाडी जाळण्यात आल्याचे समोर येत आहे. या प्रकरणात संदीप वाजे यांच्याबरोबर सहा ते सात आरोपी असल्याची शक्यता व्यक्त करत ते म्हणाले की सुवर्णा आणि संदीप यांच्यामध्ये मागील काही वर्षांपासून फारकती वरून वाद चालला होता आणि या वादातूनच ही हत्या झाल्याचे समोर येत आहे.
दरम्यान या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत असून पोलिसांनी संदीप वाजे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर पुढील तपासात अजून काही माहिती समोर येण्याची शक्यता पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी व्यक्त केली आहे. यावेळी पोलीस निरीक्षक सारिका अहिरराव स्थनिक गुन्हेशाखेचे अधिकारी देखील उपस्थित होते.