नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : ऑफिसच्या कामासाठी भाडेतत्त्वावर वाहने लावून देण्याचे आमिष दाखवून त्याद्वारे दोन वाहने स्वत:च्या ताब्यात ठेवून 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी मुंबईच्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की संतोष जीवनलाल भावसार (वय 36, रा. मालवणी बस डेपोजवळ, मुंबई) असे फसवणूक करणार्या आरोपीचे नाव आहे. भावसार याने फिर्यादी शारदा श्रीधर वाडेकर (रा. कोरोल व्हिला रो-हाऊस, संभाजी स्टेडियममागे, सिडको, नाशिक) व साक्षीदार जालिंदर भानुदास वाडेकर यांच्याशी करारनामा नोटरी वेगवेगळी करून ग्लोबल एंटरप्रायजेस नावाने सात लाख रुपये किमतीची एमएच 15 जीएल 1096 या क्रमांकाची एर्टिगा व आठ लाख रुपये किमतीची एमएच 15 ईए 9487 या क्रमांकाची मारुती एर्टिगा गाडी अशी दोन वाहने प्रत्येकी 55 हजार रुपये दरमहा भाडेतत्त्वावर ऑफिसच्या कामासाठी स्वत:च्या फायद्यासाठी ही वाहने घेतली.

तसेच दि. 1 ते 9 फेब्रुवारी दरम्यान वीर सावरकरनगर येथील नेक्सस पॉईंट येथील ग्लोबल एंटरप्रायजेस या ठिकाणी फिर्यादी वाडेकर व साक्षीदार वाडेकर यांच्याकडून ही दोन्ही वाहने आरोपी भावसार याने ताब्यात घेतली; मात्र ठरल्याप्रमाणे प्रत्येकी अॅडव्हान्स म्हणून 55 हजार रुपये देण्याचे सांगूनही पैसे न देता विश्वास संपादन केला; मात्र वाहने कब्जात घेऊनही दोन्ही वाहनांची मिळून 15 लाख रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी भावसारविरुद्ध गंगापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सूर्यवंशी करीत आहेत.