Home क्राईम पंचवटी खून प्रकरणातील आरोपी 24 तासांत गजाआड

पंचवटी खून प्रकरणातील आरोपी 24 तासांत गजाआड

0

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : आरटीओ कार्यालयाजवळ काल झालेल्या खुनातील आरोपींना पंचवटी पोलिसांनी 24 तासांत अटक केली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की 24 नोव्हेंबर रोजी रात्री 10.30 ते 1 वाजे दरम्यान राजेश वकील शिंदे या इसमाची डोक्यात दगड मारून हत्या करण्यात आली होती. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस आयुक्त दीपक पाण्डेय यांनी संशयित आरोपींचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार यांनी आरोपींचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली.

पोलीस पथकाला मिळालेल्या माहितीनुसार संशयित आरोपी अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर येथे असल्याचे समजले. तेथे शोध घेता रवी मधुकर येलमामे (वय 24) व 1 विधीसंघरशीत बालक अशा दोघांना ताब्यात घेऊन नाशिकला आणले. त्यांच्याकडे तपास केला असता त्यांनी आपल्या साथीदाराच्या मदतीने पैशांच्या देवाण-घेवाणीच्या जुन्या भांडणाच्या कारणावरून राजेश शिंदे यास ठार मारल्याचे निष्पन्न झाले. अटक आरोपींना न्यायालयात उभे केले असता 30 नोव्हेंबर पर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आली. सदर गुन्ह्यातील इतर संशयितांचा पोलीस शोध घेत आहेत.