बिबट्याच्या कातड्याची तस्करी करणारे 7 तस्कर अटकेत

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : शहापूर वनविभागाच्या धडक कारवाईत बिबट्याच्या कातडीची तस्करी करणार्‍या सात आरोपींना मुद्देमालासह ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपीमध्ये इगतपुरी तालुक्यातील तीन, त्र्यंबकेश्‍वर तालुक्यातील दोन जणांचा समावेश असून, एकूण सात आरोपी आहेत. यामुळे इगतपुरी तालुक्यात खळबळ माजली आहे. सन 2018 मध्ये इगतपुरी तालुक्यातील वनपरिमंडल अधिकारी गोरक्षनाथ जाधव यांनीही मोठ्या हिमतीने काही आरोपींना जरेबंद केले होते. शहापूर वनविभागाच्या अधिकार्‍यांनी नाशिकच्या हद्दीमध्ये येऊन मोठी टोळी उघडकीस आणली; परंतु याबाबत नाशिकमधील अधिकार्‍यांना कोणतीही माहिती नव्हती.

या घटनेबाबत अधिक माहिती अशी, की दि. 19 जानेवारीला वनपरिक्षेत्र वाशाळामधील मौजे वाशाळा गावाच्या परिसरात वन्यप्राणी बिबट्याच्या कातड्याचा व्यापार होत असल्याच्या गुप्त बातमीवरून शहापूर वनविभागाने सापळा रचला. या सापळ्यात शहापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी, वन्य प्राणिमित्र संतोष जगदाळे यांनी बनावट ग्राहक बनून आरोपींना संपर्क केला. आरोपींनी भेटण्याचे ठिकाण वाशाळा येथून बदलून इगतपुरी तालुक्यातील घाटनदेवी मंदिर परिसरात भेटण्याचे ठरविले. तेथे त्यांना बिबट्याच्या कातड्याची मोबाईलवर व्हिडिओ दाखवून त्याचा व्यवहार करायचा असल्याचे सांगितले; परंतु त्या दिवशी आरोपींनी व्यवहार केला नाही. त्यानुसार 19 जानेवारीपासून गुन्ह्यात सहभागी आरोपींनी बनावट ग्राहकाला मोबाईलवर कॉल करून बिबट्याच्या कातड्याची विक्री करण्याचे ठरविले.

त्यानुसार काल 2 फेब्रुवारी रोजी बिबटे व वन्य प्राण्यांच्या व्यवहारासाठी पहिल्यांदा घाटन देवी मंदिर परिसरात ठरले. यानंतर लगेच ठिकाण बदलून इगतपुरी तालुक्यातील उभाडे गावाजवळील घोटी सिन्नर रस्त्यालगत ठरले. त्यानुसार शहापूरचे उपवनसंरक्षक वसंत घुले यांच्या मार्गदर्शनाखाली व शहापूरचे सहाय्यक वनसंरक्षक अमोल जाधव यांच्या नेतृत्वाखाली वाशाळाचे वनपरिक्षेत्र अधिकारी विशाल गोदडे, खर्डीचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रशांत देशमुख व शहापूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश चौधरी यांच्यासह कर्मचार्‍यांनी संयुक्त सापळा रचून बनावट ग्राहक बनून आरोपी पकडले. तसेच उभाडे गावाजवळील घोटी सिन्नर रस्त्यालगत गेले असता बिबट्याच्या कातड्याचा व्यवहार करताना सात आरोपी आढळले. त्यांच्याकडे बिबट्या या वन्य प्राण्यांचे कातडे, एक नग आणि चार मोटारसायकली या मुद्देमालासह त्यांना रंगेहाथ पकडण्यात आले आहे.

या सापळ्यात आरोपी काळू सोमा भगत (वय 36, रा. भावली, ता. इगतपुरी, जि. नाशिक), अशोक सोमा मेंगाळ (वय 29, रा. भावली, ता. इगतपुरी. जि. नाशिक), योगेश लक्ष्मण अंदाडे (वय 26, रा. फांगुळगव्हाण, ता. इगतपुरी, जि. नाशिक), मुकुंदा सोमा सराई (वय 55, रा. अस्वली हर्ष, ता. त्र्यंबकेश्‍वर, जि. नाशिक), गोटीराम एकनाथ गवारी (वय 34, रा. सामोडी, ता. त्र्यंबकेश्‍वर, जि. नाशिक), रघुनाथ शंकर सातपुते (वय 34, रा. मोखाडा, ता. मोखाडा, जि. पालघर) व अर्जुन गोमा पानेडा (वय 28, रा. चाफ्याचा पाडा, शिरोळ, ता. शहापूर, जि. ठाणे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. या आरोपींवर वन्यजीव अधिनियम 1972 चे कलम 09, 44, 48 (ए) अन्वये वाशाळा रा. गु. क्र. डब्ल्यूएल-01/2021-2022 अन्वये गुन्हा नोंद दाखल करण्यात आला आहे. त्यानुसार पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.

दरम्यान संयुक्त सापळा कारवाईत वनपाल एन. एस. श्रावणे, व्ही. एस. गायकवाड, एस. बी. गाठे, वनरक्षक वाय. पी. पाटील, पी. डी. बेलदार, जी. एस. भोये, एस. एल. शिंदे, बी. पी. वसावे, एस. एस. अहिरे, डी. डी. ठोंबरे, यू. एम. घायवट, बी. एस. शेळके, व्ही. व्ही. खेडकर, आर. एन. मागी, जी. एस. खेमनर, एस. डी. धोंगडे, एम. टी. ओतडे, डी. पी. ऐवळे, सी. एस. खाडे, आर. एन. देवकत्ते व आर. एस. महाले यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!