नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : नाशिक-त्र्यंबक रोडवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत मद्यवाहतूक करणाऱ्या औरंगाबाद येथील एकास अटक केली आहे. या कारवाईमध्ये एका कारसह तब्बल दहा लाख रुपयांचा मद्यसाठा जप्त करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पथकाचे दुय्यम निरीक्षक अरूण सुत्रावे (Arun Sutrave) यांना मिळालेल्या माहितीवरून ही कारवाई करण्यात आली. त्र्यंबकरोडवरून (Trimbakeshwar Road) मोठ्या प्रमाणात केंद्रशासित प्रदेशातील दारूची वाहतूक होत असल्याची माहिती पथकास मिळाली होती. त्यानुसार बुधवारी (दि.९) पहाटेच्या सुमारास पथकाने बेळगाव ढगा (Belgaon Dhaga) येथे नाकाबंदी केली असता संशयित मद्यसाठ्यासह पथकाच्या हाती लागला. या वाहनतपासात एमएच १२ एचएम ९६९९ या एक्सयूव्ही या कारमध्ये ब्लेंडर, प्राईड ब्लेंडर, व्हिस्की, मॅकडॉल, मॅजिक मोमेंट, व्होडका, ओल्ड मन आदी प्रकारचा मद्यसाठा मिळून आला.

दरम्यान ही कारवाई भरारी पथक (patrolling team) क्रमांक एकच्या पथकाने केली आहे. या कारवाईत एकास अटक करण्यात आली असून विक्रम आगाजी साळुंखे (२९ रा.भरतनगर ता.जि.औरंगाबाद) असे अटक केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तसेच या कारवाईत वाहनासह सुमारे १० लाख १२० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला असून ही कारवाई निरीक्षक जयराम जखोरे, ब विभागाचे सुनिल देशमुख, दुय्यम निरीक्षक सुत्रावे, यशपाल पाटील, जवान सुनिल दिघोळे, धनराज पवार, एम. पी. भोये, राहुल पवार व अनिता भाड आदींच्या पथकाने केली.