नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : महिला घरात एकटी असल्याची संधी साधून अज्ञात चोरट्याने तिच्या कपाळावर व डोक्यावर जड वस्तूने मारून सोन्याची चेन व बांगड्या असा सुमारे 90 हजारांचा ऐवज बळजबरीने लुटून नेल्याची घटना पखाल रोड येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी असद अनारुद्दीन काझी (रा. करिफा अपार्टमेंट, पखाल रोड, नाशिक) हे शिक्षक आहेत. काल दुपारी साडेबारा ते दोन वाजेच्या सुमारास त्यांची आई समशाद अनारुद्दीन काझी (वय 55) या अन्सार व्हिला या पखाल रोड येथे एकट्या होत्या. त्यावेळी अज्ञात इसम त्यांच्या घरी आला. त्याने महिलेच्या डोक्यावर व कपाळावर कोणत्या तरी वस्तूने मारून त्यांना जखमी केले व त्यांच्या हातातील 60 हजार रुपये किमतीच्या सोन्याच्या बांगड्या व 30 हजार रुपये किमतीची सोन्याची चेन बळजबरीने काढून घेत लुटून नेली. या घटनेत समशाद काझी या जखमी झाल्या असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान या प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस निरीक्षक अहिरे करीत आहेत.