नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : इथेनॉल वाहतुकीच्या चार ट्रीपचे पैसे थकित असताना नव्याने दोन टँकर संबंधिताने मनमाड येथील भारत पेट्रोलियम कंपनीत जबरदस्तीने खाली करून घेतले आणि दमदाटी करून फसवणूक केली, अशी तक्रार राजस्थानमधील बिडा पिपलीनगर येथील टँकरचालक भूपेंद्रसिंग राजपूत (वय 23) याने मनमाड पोलिसांकडे नोंदविली आहे.

याबाबत भूपेंद्रसिंग राजपूत याने दिलेल्या तक्रारीनुसार तो जोलोवा दहेज (जि. भरुच, गुजरात) येथे कीर्तानी फ्रेईट कॅरिअर्स या वाहतूक कंपनीत टँकरचालक आहे. तो चालवीत असलेला टँकर क्रमांक जीजे 16 एव्ही 7997 व जीजे 16 एव्ही 2897 या क्रमांकांचे दोन टँकर इंदूर येथील ट्रान्स्पोर्टर फरहान खान यांना चालविण्यास दिलेले आहेत. फरहान खान यांचे फेथ ट्रेडर्स व लॉजिस्टिक्स ही कंपनी आहे. फरहान खान यांनी दोन्ही टँकर बीड जिल्ह्यातील पवारवाडी येथील जय महेश एमएसएल शुगर मिल या साखर कारखान्यातून इथेनॉल भरून मनमाडला भारत पेट्रोलियम कंपनीत पाठविले होतेे; मात्र हे दोन टँकर मनमाड येथे आल्यानंतर टँकरचालकाने कंपनीचे व्यवस्थापक जेठाराम चौधरी यांना फोन करून माहिती दिली असता त्यांनी संबंधित व्यक्तीकडे चार ट्रीपचे पैसे थकित आहेत. तेव्हा पुढील फोन येईपर्यंत मनमाडला टँकर खाली करू नका, असे सांगितले. त्यामुळे हे दोन्ही टँकर पानेवाडी येथील बीपीसीएल कंपनीच्या पेट्रोल पंपावर पार्क केले होते.
दरम्यान, दि. 28 जानेवारी रोजी ट्रान्स्पोर्टर फरहान खान व त्याचे साथीदार रिहान खान आणि अन्य दोघांनी फिर्यादी भूपेंद्रसिंग यास दमदाटी करून जिवे मारण्याची धमकी देऊन दोन्ही टँकरच्या चाव्या आणि भूपेंद्रसिंग याचा मोबाईल जबरदस्तीने ताब्यात घेतला आणि टँकरचे जीपीएस सील तोडण्यास सांगितले. याला भूपेंद्रसिंग याने नकार दिल्यावर त्याला जिवे ठार मारण्याची धमकी देत मनमाड येथील एका लॉजवर बंदीवासात ठेवले व दबाव टाकून शेवटी दोन्ही टँकरमधील इथेनॉल खाली करून घेऊन भूपेंद्रसिंग यास सोडून दिले. सुटका झाल्यानंतर भूपेंद्रसिंग याने फरहान खान व रिहान खान व त्याच्या साथीदारांनी दोन टँकर इथेनॉल जबरदस्तीने खाली करून घेतले, तसेच दमदाटी देऊन दहशतीत ठेवले, अशी तक्रार मनमाड पोलिसांकडे नोंदविली आहे.