Home क्राईम शहरात गळफास घेऊन तिघांच्या आत्महत्या

शहरात गळफास घेऊन तिघांच्या आत्महत्या

0

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : शहर परिसरात काल वेगवेगळ्या ठिकाणी तीन जणांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटना घडल्या. या प्रकरणी विविध पोलीस ठाण्यांत नोंद करण्यात आली आहे.

किशोर गंगाराम सैंदाणे (वय 51, रा. दत्त चौक, सिडको, नाशिक) यांनी काल दुपारी दीड वाजेच्या सुमारास राहत्या घरी घरातील हॉलच्या छताच्या हुकाला नायलॉन दोरीने गळफास घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांचा मुलगा नितेश किशोर सैंदाणे याने ही बाब अंबड पोलीस ठाण्यास कळविली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार शेख करीत आहेत.

आत्महत्येची दुसरी घटना तपोवनात घडली. नितीन दिलीप कोष्टी (रा. नक्षत्र अपार्टमेंट, औरंगाबाद रोड, रुचिरा हॉटेलजवळ, तपोवन) यांनी काल सायंकाळी 6 च्या सुमारास राहत्या घराच्या हॉलमध्ये असलेल्या पंख्याला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणी गणेश अशोक आवनकर यांनी आडगाव पोलीस ठाण्यास याबाबत माहिती दिली. या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार गायकवाड करीत आहेत.

आत्महत्येची तिसरी घटना पाथर्डी गावात घडली. मोहन परसराम बेडेकर (वय 52, रा. कडवे गल्ली, शिवाजी चौक, पाथर्डी गाव) यांनी काल (दि. 28) रात्री आठच्या सुमारास राहत्या घरात छताच्या पत्र्याच्या लोखंडी अँगलला नायलॉनच्या जाड दोरीने गळफास घेतला. त्यात त्यांचा मृत्यू झाला. ही बाब किशोर निवृत्ती नागरे यांनी इंदिरानगर पोलिसांना कळविली. त्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार पथवे करीत आहेत.