नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : ग्राहक म्हणून आलेल्या सराफी पेढीवर आलेल्या तीन अज्ञात महिलांनी एका लहान मुलीच्या मदतीने सुमारे चार लाखांचे सोन्याचे दागिने हातचलाखीने लंपास केल्याची घटना सराफ बाजारात घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की फिर्यादी संजय पुंडलिक दंडगव्हाण (रा. भागीरथी निवास, गोरेराम लेन) यांचे सराफ बाजारात भागीरथी ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात काल सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तीन अज्ञात महिला एका लहान मुलीसह खरेदीच्या बहाण्याने आल्या. त्यांनी सोन्याचांदीचे दागिने खरेदीसाठी आल्याचे सांगितले. त्यादरम्यान त्यांना दागिने दाखवीत असता या अज्ञात महिलांनी मुलीच्या मदतीने हातचलाखी करून दुकानाच्या काऊंटरमध्ये असलेले 87.600 मिलिग्रॅम वजनाचे वेगवेगळ्या डिझाईन्समध्ये तयार केलेले सुमारे चार लाख रुपये किमतीचे सोन्याचे टॉप्स दुकानदाराचे लक्ष विचलित करून चोरून नेले.
दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर दुकानमालक दंडगव्हाण यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात चोरीची फिर्याद दिली असून, पुढील तपास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक बस्ते करीत आहेत