नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : किचनच्या दरवाजाची कडी व मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्याने घरात प्रवेश करून सोन्याचांदीच्या दागिन्यांसह सुमारे सव्वादोन लाखांचा ऐवज घरफोडी करून चोरून नेल्याची घटना उत्तरानगर येथे घडली.

याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी किसन जयवंत भामरे (रा. श्रीशुभ रो-हाऊस, उत्तरानगर) हे दि. 23 ते 26 जानेवारीदरम्यान कुटुंबीयांसह बाहेरगावी गेले होते. ही संधी साधून अज्ञात चोरट्याने भामरे यांच्या राहत्या घराच्या पाठीमागील बाजूच्या किचनच्या दरवाजाची कडी व मुख्य दरवाजाचे कुलूप अज्ञात चोरट्याने कशाच्या तरी सहाय्याने तोडली.

तसेच किचनच्या दरवाजातून घरात प्रवेश केला. त्यावेळी घरातील कपाटात असलेली 45 हजार रुपये किमतीची 15 ग्रॅम वजनाची सोन्याची पोत, 51 हजार रुपये किमतीचे 17 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दोन गोळे, 30 हजार रुपये किमतीची 10 ग्रॅम वजनाची सोन्याची साखळी, 48 हजार रुपये किमतीच्या 16 ग्रॅम वजनाच्या कानातील सोन्याच्या चार रिंगा, 30 हजार रुपये किमतीच्या 10 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, 18 हजार रुपये किमतीच्या 6 ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या दोन अंगठ्या, तसेच चार हजार रुपये किमतीचे दोन मोबाईल असा एकूण 2 लाख 26 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल अज्ञात चोरट्याने घरफोडी करून चोरून नेला.
दरम्यान या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीची फिर्याद नोंदविण्यात आली असून, पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.