नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : नोकरीचे आमिष दाखवून विश्वास संपादन करून युवकाला दोन लाख रुपयांचा गंडा घालणार्या इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी प्रथमेश राजेंद्र गुळवे (वय 21, रा. त्रिमूर्ती चौक, सिडको, नाशिक) व विशाल सुरेश चव्हाण (रा. श्रद्धा महल, चक्की नाका, कल्याण, जि. ठाणे) हे दोघे एकमेकांचे नातेवाईक आहेत. चव्हाण याने 20 डिसेंबर रोजी गुळवे याला मोबाईल फोन केला. “तू जॉबसाठी इच्छुक आहेस का? आमच्या अॅपल कंपनीत व्हॅकन्सी निघाली आहे. मी तुला अॅपल कंपनीत जॉबला लावून देतो,” असे बोलून गुळवे याचा विश्वास संपादन केला. त्यानंतर आरोपीने “तुला सुरुवातीला ट्रेनिंगसाठी चेन्नईला जावे लागेल. त्यासाठी तुला स्वत:च्या पैशाने अॅपल कंपनीचा फोन व लॅपटॉप विकत घ्यावा लागेल. मी अॅपल कंपनीत मॅनेजर असल्याने मला 45 टक्के डिस्काऊंट मिळतो. मी तुला माझा अॅपल कंपनीचा आयडी नंबर देतो. त्यावर तू पैसे टाकल्यास तुला अॅपल कंपनीचा फोन व लॅपटॉप विकत घेताना 45 टक्के डिस्काऊंट मिळेल, असे बोलून गुळवे याच्याकडून आरोपी चव्हाण याने टप्प्याटप्प्याने 1 लाख 95 हजार 789 रुपये घेऊन फसवणूक केली.

दरम्यान ही बाब लक्षात आल्यानंतर गुळवे यांनी अंबड पोलीस ठाण्यात विशाल चव्हाण याच्याविरुद्ध फसवणुकीची फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पावरा करीत आहेत.