नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : घरासमोरून मोटारसायकल काढण्यास सांगितल्याचा राग आल्याने एका तरुणास मारहाण करून जिवे ठार मारण्याची धमकी देणार्या सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी सुनील राजाराम सोनवणे (रा. भवानीनगर, पिंपळगाव खांब रोड, नाशिक) यांनी आरोपी सनी अर्जुन पाळदे याला घरासमोरून मोटारसायकल काढण्यास सांगितले. याचा राग आल्याने सनी पाळदे याने त्याच्या हातातील चाकूने सोनवणे यांच्या करंगळीस गंभीर दुखापत केली, तर आरोपी सचिन अर्जुन पाळदे याने फिर्यादीच्या पत्नीच्या डोक्यात गजाने मारहाण करून दुखापत केली, तसेच संपत पाळदे, दशरथ पाळदे, कैलास पाळदे, प्रवीण काशीनाथ पोरजे (सर्व रा. वडनेर दुमाला, नाशिकरोड) यांनी फिर्यादी सोनवणे यांना लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली, तसेच तुला संपवून टाकू, असा दम दिला.

दरम्यान या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तर पुढील तपास स. पो. नि. चौधरी करीत आहेत.