नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : नाशिक शहर पोलिसांची शान,रन मशीन अश्विनी देवरे यांनी कोल्हापूर येथे डेक्कन स्पोर्स्टस क्लबने आयोजित केलेल्या बर्गमॅन 113 या ट्रायथलॉन म्हणजेच हाफ आयर्न मॅन स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावून आता रनिंग व्यतिरिक्त ट्रायथलॉन मध्ये सुद्धा विजयी परंपरा कायम ठेवली आहे. या स्पर्धेत (१.९ किमी) पोहणे, (९० किमी) सायकलिंग करणे आणि (२१.१ किमी) धावणे असे अंतर स्पर्धकांना पुर्ण करणे क्रमप्राप्त असते. सदर पोहणे, सायकलिंग करणे आणि धावणे हे प्रत्येक अंतर फुल आयर्नमॅन ट्रायथलॉनच्या निम्मे असते.

तसेच सन २०२० वर्षी गुजरात येथे झालेल्या ट्रायथलॉन स्पर्धेत पारितोषिक जिंकणाऱ्या नाशिक शहर महिला पोलिस मधील अश्विनी देवरे यांनी (हाफ आयर्न मॅन- एलाईट गटात तृतीय पारितोषिक जिंकून विजयी परंपरा कायम राखली आहे. त्याचप्रमाणे माणिक निकम – द्वितीय पारितोषिक (हाफ आयर्न मॅन – ५१ वर्षांवरील गटात) सुशील सारंगधर -द्वितीय पारितोषिक (स्प्रिंट ट्रायथलॉन- ७५० मीटर पोहणे-20 किमी सायकलिंग – ५ किमी धावणे) तसेच आयर्न मॅन किताब जिंकणाऱ्या महेंद्र छोरीया व प्रशांत डबरी व अनिकेत झंवर यांनी सुद्धा हाफ आयर्न मॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण केली.
तर या स्पर्धेत हाफ आयर्न मॅन ट्रायथलॉन किताब जिंकणाऱ्या नाशिकच्या खेळाडूंमध्ये अश्विनी देवरे, डॉ. मनीषा रौदळ, आयर्न मॅन प्रशांत डबरी, आयर्न मॅन महेंद्र छोरीया, विजय काकड, माणिक निकम, अविष्कार गचाले,रामदास सोनवणे, गणेश माळी, विधीत चोरडिया, आयर्न मॅन अनिकेत झवर यांचा समावेश आहे. तर स्प्रिंट ट्रायथलॉन किताब पटकावण्यामध्ये सुशील सारंगधर यांचा समावेश आहे.
दरम्यान नाशिक शहरातील मंडळी आरोग्य, खेळ आणि स्पर्धा यामध्ये रस घेत असतांनाच शहरातील डॉक्टर्स आणि खेळतज्ञ पुढाकार घेऊन या सर्वांना मार्गदर्शन करीत असून गेल्या ३ वर्षांत आयर्न मॅन खेळाडूंनी नाशिकचे नाव सातासमुद्रापार नोंदविले आहे. त्यामुळे येणाऱ्या वर्षांत दरवर्षी किमान १० ते २० आयर्न मॅनची भर पडेल असे चित्र सध्या तरी दिसत आहे.