Home कोरोना गैरकारभारास विरोध केला म्हणून समाजात बदनामी

गैरकारभारास विरोध केला म्हणून समाजात बदनामी

0

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : धार्मिक संस्थेत केलेल्या गैरकारभार व घटनाबाह्य कामाची माहिती वरिष्ठांना दिली म्हणून एका सभासदाची समाजात आरोपींनी बदनामी केल्याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी रूपेश विल्सन निकाळजे (रा. शांती पार्क, उपनगर, नाशिकरोड) हे संत फिलिप चर्च या धार्मिक संस्थेचे सभासद आहेत. यातील आरोपी रेव्ह शरद गायकवाड (बिशप ऑफ नाशिक) यांनी केलेला गैरकारभार व घटनाबाह्य कामाची माहिती वरिष्ठांना दिली. यामुळे गायकवाड व नाशिक धर्मप्रांताचे पदाधिकारी अनिल वंजारे, प्रवीण घुले (संत आंद्रिया चर्च), विनायक पंडित व प्रशांत पगारे यांनी संगनमताने खोटे आरोप व ठराव करून निकाळजे यांना धार्मिक संघटनेचे चर्च, डायसेस व ट्रस्टमधून, तसेच निवडणुकीत भाग न घेण्याची व मतदान न करण्याची नोटीस देऊन प्रत्यक्ष सामाजिकदृष्ट्या बहिष्कृत करून त्यांना मूलभूत हक्कापासून वंचित ठेवले.

दरम्यान याबाबतचे पत्र ख्रिस्ती समाजाच्या व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर पाठवून निकाळजे यांची समाजात बदनामी व मानहानी केली म्हणून उपनगर पोलीस ठाण्यात भा. दं. वि. कलम 499, 500, 34, महासामाजिक बहिष्कृत संरक्षण कायदा-2016 (3) (1) (2) (5) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.