ईएसआय हॉस्पिटलने पूर्ण केला एक लाख लसीकरणाचा टप्पा

नाशिक | भ्रमर वृत्तसेवा : येथील कामगार विमा योजना रुग्णालयाने कोविडचे एक लाख लसीकरण पूर्ण केले आहे. जिल्ह्यात हे उद्दिष्ट पूर्ण करणारे पहिले लसीकरण केंद्र ठरले आहे.

नाशिक जिल्ह्यातील लसीकरणाच्या वेगावर नाराजी व्यक्त करीत पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सातत्याने लसीकरणाचे प्रमाण वाढण्यासाठी पाठपुरावा केला आहे. यात आता मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील कोवीड लसीकरण अधिकारी गणेश मिसाळ यांच्यासह काही वरिष्ठ अधिकार्‍यांनीदेखील स्वत:ला यामध्ये झोकून दिले आहे. त्यामुळे सातत्याने जिल्ह्यामध्ये लसीकरणाला मोठ्या प्रमाणावर वेग आला आहे.

यातच राज्य कामगार विमा योजनेच्या रुग्णालयाने कोविड प्रतिबंधक लसीकरणाचा एक लाखापेक्षा अधिक लसीकरण करण्याचा टप्पा पूर्ण केला आहे. जिल्ह्यामध्ये महानगरपालिका क्षेत्राता लसीकरणाचा टप्पा पूर्ण करणारे एकमेव लसीकरण केंद्र होण्याचा बहुमान या लसीकरण केंद्राला मिळाला आहे. आतापर्यंत एक लाख 200 लसीकरण पूर्ण झाले असून, यामध्ये पहिला डोस 55 हजार 142 जणांनी घेतला आहे, तर दुसरा डोस 43 हजार 987 जणांनी घेतला आहे.ज्येष्ठ नागरिकांसाठी असलेला संरक्षण डोस हा 871 व्यक्तींनी घेतला आहे.

दरम्यान महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये रुग्णालयातील डॉ. राजश्री पाटील व त्यांचे सहयोगी आणि महानगरपालिका लसीकरण समन्वय अधिकारी डॉ. साळुंखे यांनी घेतलेल्या प्रयत्नांना यश आले आहे, असे उपजिल्हाधिकारी तथा नाशिक जिल्हा कोवीड लसीकरण समन्वयक गणेश मिसाळ यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने मिसाळ यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!