म्हाडाच्या परीक्षेदरम्यान तोतया परीक्षार्थीला अटक

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळाच्या (म्हाडा) विविध पदांसाठी सरळ प्रवेश भरती प्रक्रिया राबविली जात आहे. याकरिता ऑनलाईन परीक्षा घेतली जात आहे. काल (दि. 9) गुरू गोविंदसिंग कॉलेज येथील परीक्षा केंद्रावर एका तोतया परीक्षार्थीने हजेरी लावल्याचे उघडकीस आले. सुरक्षारक्षकांनी धातुशोधक यंत्राने तपासणी केली असता त्याच्या बुटामध्ये मोबाईल आढळला. तसेच त्याची कागदपत्रे बनावट असल्याचेही यावेळी स्पष्ट झाले. याप्रकरणी पोलिसांनी डमी उमेदवाराला अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार काल म्हाडाच्या विविध पदांसाठी ऑनलाईन परीक्षा गुरू गोविंद महाविद्यालयात दुपारी साडेबारा ते अडीच वाजेच्या दरम्यान होती. परीक्षेचे आयोजन टाटा कन्सल्टन्सी प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीकडून करण्यात आले होते. कंपनीचे केंद्रप्रमुख देवेंद्र मोजाड व सुरक्षारक्षक संजय आहेर यांच्याकडून तपासणी करून परीक्षार्थींना परीक्षा हॉलमध्ये सोडले जात होते.

साडेअकरा वाजेच्या सुमारास प्रवेशद्वारावर आहेर यांनी परीक्षार्थी ज्ञानेश्‍वर श्रीमंत डिघुळे (वय 22, रा. बिबेवाडी, औरंगाबाद) याची तपासणी केली. त्याने बुटामध्ये मोबाईल दडविल्याचे उघडकीस आले. त्याची अंगझडती घेतली असता एक इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसदेखील सापडले. मूळ आधारकार्ड व ओळखपत्रावरील छायाचित्रामध्ये तफावत असल्याचे आढळून आले. छायाचित्र हे परीक्षेतील मूळ परीक्षार्थी चोटीराम सीताराम बहुरेचा असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्याऐवजी संशयित डमी परीक्षार्थी ज्ञानेश्‍वर याने परीक्षा केंद्रात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला. यामुळे पोलिसांनी परीक्षा केंद्रावरून त्यास अटक केली आहे. कनिष्ठ अभियंता आशिष आंबेकर (वय 38) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक बेंडे करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!