नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : जाब विचारल्याचा राग आल्याने चार जणांनी एका युवकास सिमेंटच्या दगडाने मारहाण करून दुखापत केल्याची घटना पेठ रोड येथे घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की फिर्यादी विकी विनोद वाघ (रा. मरीमाता मंदिराजवळ, पेठ रोड, पंचवटी) हा व त्याचा मित्र कार्तिक गांगुर्डे हे मोटारसायकलीवरून दि. 6 फेब्रुवारी रोजी सायकाळी साडेसहा वाजता राहुलवाडीत चक्कर मारण्यासाठी गेले. दोघे जण सार्वजनिक शौचालयाजवळ उभे असताना आरोपी बाब्या (नाव व पत्ता माहीत नाही) हा त्यांच्याकडे बघत होता. म्हणून फिर्यादीने माझ्याकडे काय बघतोस, असे विचारले. त्याचा राग आल्याने बाब्या, योगेश, बाब्याची आई व अन्य एक महिला यांनी संगनमत करून विकी वाघ याला शिवीगाळ व मारहाण केली.

तसेच तेथे पडलेले सिमेंटचे दगड उचलून वाघ याच्या डोक्यावर मारून दुखापत केली म्हणून पंचवटी पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस हवालदार शेळके करीत आहेत.