निफाड । भ्रमर वृत्तसेवा : तालुक्यातील मौजे सुकेणेे परिसरात ऊस, द्राक्ष उत्पादकांना दर्शन देणार्या व दहशत निर्माण करणार्या बिबट्याला आज पहाटे जेरबंद करण्यात वनविभागाला यश आले आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

तसेच गेल्या अनेक दिवसांपासून मौजे सुकेणे परिसरात धुमाकूळ घालणार्या बिबट्याच्या दहशतीने ऊस व द्राक्ष उत्पादक शेतकरी अक्षरशः भयभीत झाले होते. त्यामुळे रात्रीच्या वेळेस शेतकरी शेतामध्ये जाण्यास घाबरत होते. ग्रामस्थांच्या मागणीनुसार अभिजित अशोक सुकेणकर यांच्या मौजे सुकेणे शिवारातील गट नं. 579 मध्ये वनविभागाने पिंजरा लावला होता. अवघ्या दोन दिवसांत म्हणजे आज पहाटे हा बिबट्या या पिंजर्यात जेरबंद झाला आहे.

दरम्यान ही माहिती वनविभागाला दिल्याने वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी अक्षय मेहेत्रे, मनमाडचे वनपाल भगवान जाधव, भैया शेख व वनमजूर तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि पिंजरा ताब्यात घेतला. हा बिबट्या नर जातीचा असुन 6 ते 7 वर्ष वयाचा आहे.