जय भवानी रोडला बिबट्याचा थरार; नागरिक भयभीत

नाशिकरोड । भ्रमर वृत्तसेवा : जय भवानी रोडवरील लोणकर मळा व माधव लॉन्सच्या मागील रहिवासी क्षेत्रात आज पहाटे बिबट्या दिसल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

वन विभागाच्या अधिकार्‍यांना ही माहिती मिळताच त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जय भवानी रोड परिसर हा आर्टिलरी सेंटरजवळचा भाग आहे. परिसरात जंगल असल्याने अनेकदा वन्य प्राण्यांचे दर्शन नागरिकांना होते. आज पहाटेच्या सुमारास लोणकर मळा भागात काही महिलांना बिबट्या दिसून आला, तर माधव लॉन्सच्या पाठीमागे माजी नगरसेविका जिजाबाई गायकवाड यांच्या घराच्या परिसरात सुरक्षारक्षक रामदास तरडे यास बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.

दरम्यान हा बिबट्या के.जे. मेहता शाळेमागील श्रीनिवास लोया यांच्या बंगल्यात शिरल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून समजले. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने लोया कुटुंबियांना घराबाहेर येण्यास मनाई केली. या ठिकाणी वनविभागाचे पथक बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यु ऑपरेशन राबवले. मात्र बिबट्याने त्यांना हुलकावणी देत लोया यांच्या शेजारी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विजय शिंदे यांच्या बंगल्याकडे झेप घेतली. आता या बिबट्या शिंदे यांच्या बंगल्याच्या आवारात असल्यामुळे तेथे रेस्क्यु ऑपरेशन सुरु आहे.

तसेच बिबट्याचा थरार अनुभवण्यासाठी नागरिकांनी या परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी केली असून, उपनगर पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. तसेच वन विभागाचे अधिकारी विवेक भदाणे, वनरक्षक अनिल आहेरराव, उत्तम पाटील, गोविंद पंढरे, भाऊसाहेब ठाकरे आदींचे पथक घटनास्थळी दाखल झाले आहे. त्यांनी शोधकार्य सुरू केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!