नाशिकरोड | भ्रमर वृत्तसेवा : हिरावाडी पंचवटी येथून मुलीला भेटून परत लोणी,राहता येथे आपल्या घरी जात असलेल्या वृद्ध आईचा चालत्या एस टी बसमध्ये हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, अहमदनगर जिल्ह्यातील राहता मधील लोणी येथील सुलोचना भीमराव पवार (वय ७२) ह्या वृद्ध महिलेला दोन मुली, एक मुलगा आहे. पंचवटी हिरावाडी येथे राहणाऱ्या विद्या श्रीश्रीमाळ या मुलीला भेटण्यासाठी त्या नेहमी येत असत. दहा, बारा दिवसापूर्वी त्या मुलीला भेटण्यासाठी आल्या. आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास सुलोचना पवार या वृद्ध महिलेचे जावई आकर्षण श्रीश्रीमाळ यांनी त्यांना महामार्ग बसस्थानक येथून नाशिक-नगर क्र MH 14 BT 3739 या बसमध्ये लोणीला जाण्यासाठी बसवून दिले.

तसेच काही वेळाने बस सुटल्यानंतर सुलोचना पवार या वृद्ध महिलेने सह प्रवाशांशी गप्पा मारल्या. बसने नाशिकरोड स्थानक सोडून सिन्नर फाटा पर्यंत जात नाही तोच सुलोचना पवार यांना जोरदार हृदविकाराचा झटका आला. प्रवाशांनी आरडाओरडा केल्याने घाबरलेल्या एसटी चालकांने बस थेट नाशिकरोड पोलीस ठाण्यात घेऊन आला. नाशिकरोड पोलिसांनी वृद्ध महिलेस बिटको हॉस्पिटलमध्ये नेले असता वैद्यकीय अधिकारी यांनी तिला मयत घोषित केले.