नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : निवृत्ती वेतनासंबंधी तक्रारींचे निवारण करण्यासाठी डाक कार्यालयात 4 मार्च 2022 रोजी सकाळी 11.00 वाजता पेन्शन अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने पेन्शन व परिवार पेन्शन घेणाऱ्या व्यक्तींनी विहित नमुन्यातील आपले अर्ज 11 फेब्रुवारी 2022 पर्यंत कार्यालयात सादर करावे, असे नाशिक डाकघर विभागाचे प्रवर अधिक्षक मोनह अहिरराव यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

सेवानिवृत्त डाक कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वेतनासंबंधीच्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी डाक विभागातर्फे नियमितपणे पेन्शन अदालतीचे आयोजन केले जाते. यात कर्मचाऱ्यांच्या तक्रारींचा योग्य प्रकारे न्यायनिवाडा करण्यासाठी डाक विभागाचे संबंधित अधिकारी तक्रारदारांना प्रत्यक्ष भेटतात. त्यांच्या तक्रारींची दखल घेवून त्या लवकरात लवकर सोडविण्याचा प्रयत्न करीत असतात. त्या अनुषंगाने सर्व संबंधितांनी विहीत मुदतीत आपले निवृत्ती वेतनासंबंधित तक्रारी अर्ज प्रवर अधिक्षक डाक घर, नाशिक विभाग, जी पी ओ आवार, नाशिक -1 या पत्त्यावर वेळेत सादर करावेत, असे आवाहन प्रवर अधिक्षक मोनह अहिरराव यांनी शासकीय प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

या पेन्शन अदालतीमध्ये कायदा संबंधित प्रकरणे, उत्तराधिकारी तथा धोरणात्मक स्वरुपाच्या तक्रारी विचारात घेतल्या जाणार नाही. तक्रारींचा उल्लेख सर्व तपशिलासह केलेला असावा, दिनांक व ज्या अधिकाऱ्यास मुळ तक्रार पाठवली असेल त्याचे नाव, हुद्दा तसेच सेवा निवृत्त झालेल्या कार्यालयाचे किंवा इतर विभागीय कार्यालयाचे नाव व सेवानिवृत्तीची तारीख, पी.पी.ओ क्रमांक, पेन्शन घेत असलेल्या पोस्ट ऑफिस व मुख्य पोस्ट ऑफीसचे नाव, घरचा पत्ता व फोन नंबर, थोडक्यात तक्रार असल्यास विवरणपत्र, पेन्शन घेणारा व परिवार पेन्शन घेणाऱ्या व्यक्तिची सही व तारीख आदि तपशिलवार माहिती आपल्या तक्रार अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. तसेच कोविड महामारीच्या उद्भवलेल्या परिस्थितीमुळे पेन्शन अदालतला प्रत्यक्ष उपस्थित राहणे टाळावे, असेही शासकीय प्रसिद्धी पत्रकात नमुद करण्यात आले आहे.