नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : जिल्ह्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने जिल्ह्यातील कोरोना निर्बंधांमध्ये काही प्रमाणात शिथिलता आणण्याचा निर्णय पालकमंत्री छगन भुजबळ यांनी आज जाहीर केला.
जिल्हाधिकारी कार्यालयात आज जिल्हा आपत्ती व्यवस्थान समितीची बैठक भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीस पोलीस आयुक्त दीपक पांडेय, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त कैलास जाधव, पोलीस अधीक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लिना बनसोड यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यातील पर्यटन स्थळांवर लावण्यात आलेल्या बंदीचा निर्णय आजच्या बैठकीत मागे घेण्यात आला. मात्र, या ठिकाणी कोरोनाचे निर्बंध पाळावेच लागणार आहेत. जिल्ह्यात 18000 रुग्ण होते ती संख्या 15 हजारांवर आलेली आहे. त्याच बरोबर जिल्ह्यातील पॉझिटिव्हीटी रेट 41 टक्क्यांहून 27 टक्क्यांवर आला आहे. 90-95 टक्के रुग्ण हे घरीच बरे होत असल्याने ती एक दिलासादायक बाब आहे. ज्या गतीने रुग्ण वाढत होते, ती संख्याही आता कमी झालेली पाहायला मिळत आहे. लसीकरणाकडे नागरिकांचा कल हळूहळू वाढत आहे. मात्र, लसीकरणाची गती वाढण्याची आवश्यकता असल्याचे भुजबळ म्हणाले.