नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : तब्बल आठ तासांच्या रेस्क्यू ऑपरेशननंतर जय भवानी रोडवरील लोणकर मळा व माधव लॉन्सच्या मागील रहिवासी क्षेत्रात आलेला बिबट्या दुपारी दोनच्या सुमारास ताब्यात घेण्यास वन विभागाच्या पथकाला यश आले. सकाळी सात वाजेपासून सुरु असलेल्या या धावपळीत बिबट्या एका कारवर खाली बसला त्यांनतर वन विभागाने त्या कारवर बिबट्या पडकण्याचे जाळे टाकून चारही बाजूने जाळी पॅक केली. तसेच बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन त्याला गुंगी आल्यानंतर वन विभागाने या बिबट्यास ताब्यात घेतले.

सोमवारी पहाटेस एका सोसायटीत असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात बिबट्या सोसायटीत आल्याचे दिसून आले. तसेच एका इमारतीच्या सुरक्षा रक्षकानेही बिबट्याला पहिले होते. त्यामुळे बिबट्या आल्याचे समजताच परिसरात नागरिकांमध्ये दहशत पसरली त्याचबरोबर बिबट्या पाहण्यासाठी नागरिकांची गर्दीही वाढली होती. त्यामुळे पोलिसांनी वन विभागाच्या पथकास बिबट्या पकडताना गर्दीचा सामना करावा लागला.
वन विभागाच्या अधिकार्यांना सकाळी ही माहिती मिळताच त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. जय भवानी रोड परिसर हा आर्टिलरी सेंटरजवळचा भाग आहे. परिसरात जंगल असल्याने अनेकदा वन्य प्राण्यांचे दर्शन नागरिकांना होते. आज पहाटेच्या सुमारास लोणकर मळा भागात काही महिलांना बिबट्या दिसून आला, तर माधव लॉन्सच्या पाठीमागे माजी नगरसेविका जिजाबाई गायकवाड यांच्या घराच्या परिसरात सुरक्षारक्षक रामदास तरडे यास बिबट्याचे दर्शन झाले. त्यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले.
http://https://youtu.be/Yn1WzUoYPzQ
दरम्यान हा बिबट्या के.जे. मेहता शाळेमागील श्रीनिवास लोया यांच्या बंगल्यात शिरल्याचे सीसीटीव्हीच्या फुटेजच्या माध्यमातून समजले. त्यामुळे वनविभागाच्या पथकाने लोया कुटुंबियांना घराबाहेर येण्यास मनाई केली. या ठिकाणी वनविभागाचे पथक बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यु ऑपरेशन राबवले. मात्र बिबट्याने त्यांना हुलकावणी देत लोया यांच्या शेजारी असलेल्या पोलीस उपनिरीक्षक विजय शिंदे यांच्या बंगल्याकडे झेप घेतली. त्यामुळे तिथे रेस्क्यू ऑपरेशन राबवत असताना बिबट्याने आणखी काही बंगाल्यांत कंपाऊंड वरून झेप घेतली. सोसायटी व बंगले परिसर असल्यामुळे बिबट्याने नागरिक येताच विविध सोसायट्यांमध्ये उड्या मारत असल्यामुळे पोलिसांनी वन विभागाच्या पथकाची बरीच धावपळ झाली.
अखेर दुपारी दोन वाजेच्या सुमारास हा बिबट्या दमून एका कारखाली घुसला याचाच फायदा घेत वनविभागाने त्या कारवर बिबट्या पकडण्याचे जाळे टाकले आणि जमीनी पर्यंत येईल अशा पद्धतीने चारही बाजूने कार पॅक केली. त्यानंतर भुलीचे इंजेक्शन देऊन बिबट्यास ताब्यात घेण्यास तब्बल आठ तासानंतर यश आले. वन विभागाचे अधिकारी विवेक भदाणे, वनरक्षक अनिल आहेरराव, उत्तम पाटील, गोविंद पंढरे, भाऊसाहेब ठाकरे आदींच्या पथकाने ही मोहीम यशस्वी केली त्यांना उपनगर व नाशिकरोड पोलिसांनी सहकार्य केले.