पुढील तीन महिन्यात नाशिकच्या वाड्या-पाड्यापर्यंत पाणी पोहचवणार – पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल करतांना शहरांसोबतच खेडी व वाड्या-पाड्यांचा विकास केला जाईल. जलजीवन मिशनच्या माध्यमातून पुढील तीन महिन्यात जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील वाड्या-पाड्यांपर्यंत पाणी पोहचवणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे राजशिष्टाचार, पर्यावरण, वातावरणीय बदल व पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज सेंद्रीपाडा येथे केले.

आज त्र्यंबकेश्वर येथील दूर्गम भागात लोकसहभागातून साकारलेल्या सावरपाडा व सेंद्रीपाडा यांना जोडणाऱ्या लोखंडी पुलाची पाहणी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्याचे कृषीमंत्री तथा माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे, खासदार हेमंत गोडसे, आमदार हिरामण खोसकर, नरेंद्र दराडे, सुहास कांदे, माजी आमदार वसंत गिते, निर्मला गावीत, काशिनाथ मेंगाळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, जिल्हा पोलीस अधिक्षक सचिन पाटील, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, इगतपुरी-त्र्यंबक उपविभागीय अधिकारी तेजस चव्हाण,महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे उपअभियंता, प्रादेशिक व्यवस्थापक महेश बागुल, नगरसेवक सुधाकर बडगुजर, सेंद्रीपाडाचे सरपंच विठ्ठल दळवी आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे म्हणाले की, आज प्रसार माध्यम संस्थांकडून या भागातील समस्या माझ्यापर्यंत पोहचल्या आहेत. या भागात पाऊस जास्त पडतो, परंतु पाणी साठवणीसाठी योग्य उपाययोजना नसल्याने उन्हाळ्यात पाणी टंचाईचा प्रश्न येथील भागात जास्त भेडसावतो.आज प्रत्यक्ष भेटीतून या भागातील लोकांच्या समस्या जास्त जवळून जाणून घेता आल्या आहेत. या आदिवासी भागात पिण्याच्या पाण्यासाठी महिलांना दूर्गम भागात डोक्यावर हंडी घेऊन पायपीट करावी लागते. जलजीवन योजनेच्या माध्यमातून येत्या तीन महिन्यांत या वाड्या-पाड्यातील प्रत्येक घराच्या दारापर्यंत आपण पाणी पोहवणार असल्याची ग्वाही पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी उपस्थित ग्रामस्थांना दिली आहे.

आदिवासी वाड्या- पाड्यातील ग्रामस्थांची नाळ ही पर्यावरणाशी जोडली गेली आहे,त्यामुळे आदिवासी वाड्या-पाड्यांचे जतन करणे हे सर्वांचे आद्य कर्तव्य आहे. शेतीला प्राधान्य देवून आदिवासी वाड्या-पाड्यात रस्ते, वीज व पाणी या मुलभुत सुविधा उपलब्ध करून देण्यासोबतच या भागात पर्यटन विकासाच्या दृष्टीने शासनस्तरावर नक्कीच प्रयत्न करणार असल्याचेही पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!