पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण हा आपल्यासाठी अतिशय आनंदाचा क्षण – छगन भुजबळ

पुणे । भ्रमर वृत्तसेवा : समाजातील धर्मभेद दूर करण्याचे अलौकिक कार्य महात्मा फुले यांनी केले. तर मुंबईतील दंगा थांबविण्यासोबतच अलौकीक सामाजिक कार्य सावित्रीबाई फुले यांनी केले. मात्र अलीकडे धर्मा धर्माचे विष विश्वविद्यालयात पसरविण्याचे काम केलं जातं आहे. आपल्या सर्वांची ही जबाबदारी आहे की हे विष विद्यार्थ्यांमध्ये न पेरता त्यांना शिक्षण करूद्या असे प्रतिपादन राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण करण्यात आले. या सोहळ्यास राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे दृकश्राव्य माध्यमातून सहभागी झाले होते. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलतांना छगन भुजबळ म्हणाले की, ब्रिटिशांनी महात्मा फुले यांना पुणे आयुक्त नेमले त्यावेळी शाळा, पाणी, रस्ते, दिवे यांचा विकास केला. यांच्या या कार्याबद्दल सत्यशोधक चळवळीचे केशवराव जेधे यांनी ठराव मांडला. या प्रस्तावाला अनेकांनी विरोध केला ४४ वर्षानंतर पुतळा बसविण्यात आला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी नाशिक येथे १९५१ साली अर्धाकृती पुतळा उभारण्याचे काम केलं. महात्मा फुले यांनी १८४८ साली भिडेवाडा, बुधवार पेठ पुणे येथे भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. त्यांनी आपली पत्नी सावित्रीबाई फुले यांना शिक्षित करून शिक्षिका केले. सावित्रीबाई फुले या देशातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका झाल्या. त्यामुळे आज देशातील स्त्री शिक्षित होऊन उच्चपदावर कार्यरत आहे हे केवळ महात्मा जोतीराव फुले व क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यामुळे शक्य झाले. फुले दाम्पत्याने सुरु केलेल्या पहिल्या शाळेत फातिमा शेख यांनी महिला आणि मुलींना शिकवण्याचे काम केले. फुले दाम्पत्या सोबत फातिमा शेख यांनी समाजातील गरीब, वंचित घटक आणि मुस्लिम महिलांना शिक्षण देण्याचे काम सुरू केले. वर्ग, धर्म आणि लिंग मुळं शिक्षण नाकारलं गेलेल्यांच्या शिक्षणासाठी त्यांनी काम केले.

ते पुढे म्हणाले की, फुले दाम्पत्याच्या या कार्याचा सन्मान व्हावा म्हणून अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे सातत्याने करण्यात आलेल्या प्रयत्नांतून पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असे नामकरण करण्यात आले. तसेच सन २००४ साली नामांतर समिती आणि विविध पक्षांनी विद्यापीठाचे आधीचे नाव बदलून सावित्रीबाई फुले विद्यापीठ करावे अशी मागणी केली. यासाठी नामांतर समितीने वेळोवेळी आंदोलने केली. विद्यापीठात झालेल्या अधिसभेत सिनेटने नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. हा प्रस्ताव महाराष्ट्र राज्य सरकारकडे पाठवण्यात आला. पुणे विद्यापीठाच्या नावाशी, स्त्रीशिक्षणासाठी आपले आयुष्य वेचलेल्या भारतातील पहिल्या महिला शिक्षिका व मुख्याध्यापिका सावित्रीबाई फुले यांचे नाव जोडण्याचा निर्णय घेण्यात आला व ७ जून २०१४ मध्ये झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत यावर शिक्कामोर्तब झाले. त्यानंतर सन २०१४ साली पुणे विद्यापीठाला देऊन विद्यापीठाचा गौरव केला. माजी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्ट २०१४ मध्ये पुणे विद्यापीठाला अखेर क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले असा नामविस्ताराचा समारंभ पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार साहेब, तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आदींसह मान्यवर उपस्थित राहिले या आठवणींना उजाळा दिला.

पुढे बोलतांना ते म्हणाले की, पुणे विद्यापीठाचा नाविस्तार झाला त्यानंतर या विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पूर्णाकृती पुतळा असावा यासाठी देखील आपले सातत्याने प्रयत्न सुरु होते. त्यानंतर आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थित आज या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात येत आहे ही आपल्यासाठी अतिशय आनंदाची बाब असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी या पुतळ्याचे अनावरण केले त्याबद्दल त्यांचे आभार मानतो असेही भुजबळ यावेळी म्हणाले. तसेच सावित्रीबाई फुले यांचा जीवनपट जगभरात पोहचावे यासाठी छोटी पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आहे. विविध भाषांच्या माध्यमातून त्यांचा हा जीवनपट जगभरात जावा यासाठी आपले प्रयत्न असून फुले दाम्पत्याचे समग्र वाङ्ममय पुन्हा प्रकाशित करून अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचविण्यात येईल. ओबीसींच्या प्रश्न सोडविण्याचे काम राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच विरोधी पक्षनेते यांच्या राज्याचे राज्यपाल यांच्या सहकार्यातून केलं जातं असून गोर गरिबांना हक्क मिळाला पाहिजे यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असेही त्यांनी यावेळी सांगितले.

या कार्यक्रमास राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील,उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत,विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलमताई गोऱ्हे,दृकश्राव्य माध्यमातून विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट, उपमहापौर सुनीता वाडेकर, कुलगुरू प्रा.डॉ.नितीन करमळकर, प्र.कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, माजी खासदार समीर भुजबळ,आयोजन समितीचे अध्यक्ष राजेश पांडे,डॉ.संजय चाकणे, विजय सोनवणे, डॉ.संजीव सोनवणे,डॉ एन बी पवार, प्रा.हरी नरके, बापू भुजबळ, सुनेत्रा पवार,डॉ.शेफाली भुजबळ,राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश पदाधिकारी दिलीप खैरे, महिला प्रदेशाध्यक्ष मंजिरी धाडगे, मूर्तिकार संजय परदेशी, विभागीय अध्यक्ष प्रित्येश गवळी, ऍड.सुभाष राऊत, बाळासाहेब कर्डक, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष समाधान जेजुरकर, अविनाश चौरे, शहराध्यक्ष पंढरीनाथ बनकर,वैष्णवी सातव यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!