हुडहुडी वाढणार : नाशिकसह ‘या’ ९ जिल्ह्यांना हवामान विभागाकडून यलो अलर्ट

नाशिक । भ्रमर वृत्तसेवा : राज्यात काल सर्वात कमी किमान तापमानाची (Lowest temperature) नोंद जळगाव याठिकाणी करण्यात आली आहे. काल येथील तापमान 5 अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तर जळगावसोबतच उत्तर महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा घसरला होता. त्यानंतर आजही उत्तर महाराष्ट्र, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत थंडीची लाट (Cold wave) कायम राहणार असून पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत. त्यातच आज एकूण 9 जिल्ह्यांना हवामान विभागाकडून थंडीचा यलो अलर्ट (yellow alert) जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाने आज नाशिकसह, औरंगाबाद, नंदुरबार, धुळे, जळगाव, जालना, परभणी, हिंगोली आणि नांदेड या नऊ जिल्ह्यांत थंडीचा येलो अलर्ट जारी केला आहे. आज सकाळपासूनच संबंधित जिल्ह्यात थंडगार वारे वाहत होते. तर मध्य रात्री आणि पहाटे याठिकाणी धुक्यासह कडाक्याची थंडी पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. दरम्यान या संबंधित जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी किमान तापमान एक अंकी नोंदण्याची शक्यता आहे.

दरम्यान दुसरीकडे येत्या 48 तासात उत्तर प्रदेशातील तेराई पट्ट्यासह बिहारमध्ये अनेक ठिकाणी पहाटे आणि रात्रीच्या वेळी दाट धुके पडण्याची शक्यता आहे. तर हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब आणि हरियाणा या राज्यात पुढील चोवीस तासांत थंडीच्या लाटेसह दाट धुके पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याने संबंधित राज्यातील लोकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!