Home देश तुरुंगाला भीषण आग; ४१ कैदी ठार तर ३९ जण जखमी

तुरुंगाला भीषण आग; ४१ कैदी ठार तर ३९ जण जखमी

0

नवी दिल्ली  | भ्रमर वृत्तसेवा : इंडोनेशियाची राजधानी जकार्ताजवळ असणार्‍या एका तुरुंगाला मध्यरात्री भीषण आग लागली. या आगीमध्ये 41 कैद्यांचा मृत्यू झाला असून 39 जण जखमी झाले असल्याचे वृत्त आहे.

कायदा आणि मानवाधिकार मंत्रालयाच्या कारागृह विभागाच्या प्रवक्त्या रिका अपारिंती यांनी या घटनेची माहिती दिली आहे. मध्यरात्री 1 ते 2 वाजेच्या दरम्यान ही आग लागली. अधिकारी अजूनही कारागृहातील कैद्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत.

रॉयटर्सच्या म्हणण्यानुसार, तुरुंगात क्षमतेपेक्षा जास्त कैदी होते. मध्यरात्री ही आग लागली. यावेळी बहुतेक कैदी झोपलेले होते. या आगीत अनेक कैदी गंभीर भाजले आहेत. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

टेंगरंग कारागृहाचा ताबा घेण्यासाठी शेकडो पोलीस आणि सैनिक तैनात करण्यात आले आहेत. तुरुंगात 1,225 कैद्यांची क्षमता असताना 2000 पेक्षा जास्त कैदी ठेवण्यात आले आहेत. जेव्हा आग लागली तेव्हा ब्लॉक सी मध्ये 122 कैदी होते. काही तासांनंतर आग विझवण्यात यश आले आहे.

तुरुंगाला आग नेमकी कशी लागली, याची चौकशी सुरू करण्यात आली आहे. सर्व जखमी कैद्यांना उपचारासाठी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. इंडोनेशियात तुरुंगातून पळून जाण्याची आणि दंगली होण्याच्या घटना नेहमी घडत असतात. या तुरुंगात मोठ्या संख्येने बेकायदेशीर ड्रग्जच्या विरोधात अटक झालेल्या कैद्यांना ठेवण्यात आले आहे.