Home देश जीप-ट्रकचा भीषण अपघात, आठ जणांचा जागीच मृत्यू

जीप-ट्रकचा भीषण अपघात, आठ जणांचा जागीच मृत्यू

0

नवी दिल्ली | भ्रमर वृत्तसेवा : कर्नाटकमधील चिक्कबळापूर जिल्ह्यात चिंतामणी तालुक्यातील मरिनायकनहळी गेटजवळ भीषण अपघात झाला आहे. ट्रक आणि जीप यांच्यामध्ये झालेल्या भीषण अपघातात ८ जणांचा मृत्यू झाला आहे. तर १० पेक्षा जास्त जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघात इतका भीषण होता की जीपचा जागीच चुराडा झाला आहे.

या भीषण अपघातांमध्ये मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जीपची ट्रकला धडक झाल्याने भीषण अपघात झाला आहे. हा अपघात इतका भीषण होता की, ६ प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर २ जणांचा उपचारावेळी मृत्यू झाला आहे. काही जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. यामुळे मृताची संख्या आणखी वाढण्याची भिती वर्तवली जात आहे.

तसेच काही जखमींवर कोलार एसएनआर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर गंभीर जखमींना बेंगळुरु मधील रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली आहे. चिंतामणी ग्रामीण पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. 

दरम्यान रस्त्याचे काम सुरु होते. त्याठिकाणी हा भीषण अपघात झाला आहे. या भीषण अपघताची दृश्ये अंगाचा थरकाप उडवणारी आहेत. अपघातग्रस्त जीपमध्ये चालकासह १७ जण प्रवास करत होते. यामुळे चालकाचे नियंत्रण सुटल्याचा दावा करण्यात येत आहे. प्रवासी वाहतूकीकरिता जीपचा वापर सर्रास केला जातो. पोलिसांनी यावर आतापर्यंत एकदाही कारवाई केली नाही. अथवा साधी तपासणी देखील केली नाही, अशी माहिती स्थानिकांनी दिली आहे. पोलिसांनी जीप चालकाला अटक केली असून चौकशीला सुरुवात करण्यात आली आहे.