लखीमपूर हिंसाचार प्रकरणातील ‘त्या’ मुख्य आरोपीला हायकोर्टाकडून जामीन मंजूर

नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : लखीमपूर खेरी (Lakhimpur Violence Case) येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्याच्या कथित आरोपांमुळे तुरुंगात असलेल्या केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा (Ajay Mishra) यांचा मुलगा आशिष मिश्रा (Ashish Mishra) याला उच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. अलाहाबाद उच्च न्यायालयाच्या लखनौच्या खंडपीठाने आशिष मिश्राला जामीन (Bail) मंजूर केला आहे. उच्च न्यायालयाकडून जामीन मिळाल्यानंतर आशिष मिश्रा उद्या म्हणजेच 11 फेब्रुवारीला तुरुंगातून बाहेर येईल.

लखीमपूर हिंसाचारात आशिष मिश्रा यांचा सहभाग असल्याचा आरोप खोटा ठरवण्यासाठी सुरुवातीला विविध तर्कवितर्क देण्यात आले. आशिष मिश्रा आणि कुटुंबीयांनी सांगितले की, घटनेच्या वेळी तो तिथे नव्हता. मात्र, नंतर एसआयटीच्या तपासात आशिष मिश्राचे नाव मुख्य आरोपी म्हणून समोर आले. पाच हजार पानांच्या आरोपपत्रात एसआयटीने आशिष मिश्रा घटनास्थळी उपस्थित असल्याचे सांगितले होते. या प्रकरणात एसआयटीने आशिषचे नाव मुख्य आरोपी म्हणून ठेवले होते. तसेच या प्रकरणाचा तपास करणार्‍या एसआयटीने शेतकर्‍यांना वाहनाने चिरडण्याची संपूर्ण घटना सुनियोजित कट होती असे म्हटले होते.

दरम्यान तपासात, एसआयटीला 17 वैज्ञानिक पुरावे, सात भौतिक पुरावे आणि 24 व्हिडिओ फोटो सापडले होते ज्यामुळे आरोपींच्या अडचणी वाढल्या होत्या. याशिवाय 208 जणांनी साक्ष दिली होती. या आधारे एसआयटीने आरोपपत्र लिहून ठेवले आहे. तर मंत्र्यांचा मुलगा आशिष घटनास्थळी उपस्थित असल्याचे साक्षीदारांनी एसआयटीला सांगितले होते. त्यानुसार या घटनेत एसआयटीने एकूण १६ जणांना आरोपी बनवले होते. तसेच एसआयटीने आरोपींवर भादवि कलम ३०७, ३२६, ३०१, ३४,१२०ब, १४७, १४८,१४९, ३/२५/३० नुसार गुन्हा दाखल केला होता.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!