नवी दिल्ली | भ्रमर वृत्तसेवा : उत्तरप्रदेश निवडणुकीपूर्वी आयकर विभागाने धाडसत्र सुरु केले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी व्यावसायिक पीयुष जैन आणि पुष्पराज जैन यांच्या घरी आयकर विभागाने धाडी टाकल्या होत्या. त्यानंतर आता उत्तर प्रदेश केडरचे माजी आयपीएस अधिकारी आर. एन. सिंह यांच्या नोएडा येथील घरावर आयकर विभागाच्या पथकाने छापा टाकला असून या कारवाईत करोडोंचे घबाड हाती लागले आहे. घराच्या बेसमेंटमध्ये तब्बल 650 लॉकर असल्याचे समोर आले असून हे सर्व लॉकर जप्त करण्यात आले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून ही कारवाई सुरू असून अजूनही घराची झडती घेण्यात येत आहे. दरम्यान, सिंह यांचे समाजवादी पार्टी कनेक्शन असल्याचंही सांगण्यात येत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, नोएडातील सेक्टर 50 येथे आर. एन. सिंह यांचे निवासस्थान असून तिथे त्यांचा मुलगा सुयश राहतो तर आर. एन. सिंह आणि त्यांची पत्नी सध्या मिर्झापूर येथे वास्तव्याला आहेत. सिंह यांच्या नोएडातील सेक्टर 50 च्या ए ब्लॉकमधील मनसम कंपनीच्या कार्यालयात मोठ्या प्रमाणात रोकड असल्याची खबर आयकर विभागाला मिळाली होती. त्याआधारे छापा टाकण्यात आला असता घराच्या बेसमेंटमध्ये 650 लॉकर आढळून आले आहेत. ही कंपनी 2017 मध्ये सुरू करण्यात आली होती. तर या कंपनीकडे 700 खाजगी लॉकर्स होते. त्यापैकी बहुतेक रिकामे होते. तसेच या कंपनीच्या 18 ते 20 लॉकरमधून या अधिकाऱ्यांनी 5.8 कोटी रुपयांची अघोषित रोकड जप्त केली असून जी 2000 आणि 500 रुपयांच्या नोटांमध्ये आहे. तर ही रोकड बेनामी मालमत्ता आहे की नाही हे पाहण्यासाठी आम्ही तपास सुरू केला असून काही कागदपत्रे सापडली असल्याची माहिती आयकर विभागाच्या अधिकाऱ्याने दिली आहे. तसेच या लॉकरमधून आतापर्यंत 3 कोटी इतकी रोकड जप्त करण्यात आली आहे. हे सर्व लॉकरही ताब्यात घेण्यात आले आहेत.
दरम्यान ही कंपनी या माजी आयपीएस अधिकाऱ्याच्या पत्नीच्या नावावर नोंदणीकृत होती. या जोडप्याचा मुलगा लॉकर्सचा कस्टोडियन आहे. तसेच आयटी अधिकाऱ्याने सांगितले की, “लॉकर्सच्या मालकांचे राजकारण्यांशी काही संबंध आहेत की नाही किंवा राज्यातील निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारांना पैसे दिले जात आहेत का, हे आम्ही शोधण्याचा प्रयत्न करत आहोत. अशी माहिती त्याने दिली आहे.