पाकिस्तानच्या कुरापती सुरूच; ड्रोनमधून फेकली स्फोटके

नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : पंजाबमध्ये भारत-पाकिस्तान (Indo Pak Border) सीमेलगत पाकिस्तानी ड्रोनमधून दोन बॉक्स फेकल्याचा संशय येताच बीएसएफ (BSF) जवानांनी ड्रोनवर गोळीबार करत पाकिस्तानचा डाव सुरक्षा दलांनी उधळून लावला आहे. गोळीबारानंतर ड्रोन पुन्हा पाकिस्तानच्या दिशेने निघून गेला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सुरक्षा दलांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. तसेच शोध मोहीम सुरू असताना काही स्फोटके देखील आढळून आली आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणुका होणार असून तेथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. याच दरम्यान, पाकिस्तानने वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. पण बीएसएफ जवानांनी त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. बीएसएफच्या गुरुदासपूर सेक्टरमध्ये 73 बटालियनच्या जवानांना अमृतसर, पंजाबमधील अजनाला तहसीलमधील पंजग्राहियन सीमा चौकीवर ड्रोन दिसले. त्यानंतर सतर्क जवानांनी सीमेवरून उडणाऱ्या पाकिस्तानी ड्रोनवर गोळीबार केला आणि दहशतवादी प्रयत्न हाणून पाडला.

ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या दिशेने काहीतरी फेकल्याचा बीएसएफ जवानांना संशय आला. तसेच मंगळवारी रात्री 12 वाजण्याच्या सुमारास बीएसएफच्या पंजग्राहियन बीओपीवर तैनात असलेल्या बीएसएफ जवानांना पाकिस्तानी ड्रोन भारत-पाक सीमेवर उडताना दिसला. यानंतर सुरक्षेसाठी तैनात असणाऱ्या जवानांनी ड्रोनवर गोळीबार सुरू केला. या प्रकरणाला दुजोरा देताना बीएसएफ अधिकाऱ्यांनी सांगितले की, बीएसएफ जवानांनी सीमेवर उडणाऱ्या ड्रोनवर गोळीबार केला आहे. ड्रोनच्या माध्यमातून भारताच्या दिशेने काही वस्तू फेकल्याचा संशय असून दोन ठिकाणी स्फोटके सापडली. तसेच त्यानंतर आता मोठी शोध मोहीम सुरू करण्यात आली असून पाकिस्तानातून स्फोटक पदार्थ, शस्त्रे आणि हेरॉईन सोडले जाण्याची भीती आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!