इंदूर । भ्रमर वृत्तसेवा : अध्यात्मिक गुरु भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात इंदूर न्यायालयाने महत्त्वाचा निकाल दिला आहे. भय्यूजी महाराज यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी मुख्य सेवक विनायक, चालक शरद आणि केअरटेकर पलक यांना न्यायालयाने दोषी ठरवले आहे. भय्यू महाराज यांनी २०१८ मध्ये स्वतःच्या सर्व्हिस रिव्हॉल्व्हरमधून गोळी झाडत आत्महत्या केली होती. त्यानंतर महाराष्ट्रासह देशभरात खळबळ उडाली होती.

त्यांच्या आत्महत्येनंतर या प्रकरणी न्यायालयात सुनावणी सुरू होती. अखेर इंदोर न्यायालयाने भय्यू महाराजांचा सेवक शरद, केअर टेकर पलक आणि चालकाला दोषी ठरवले आहे. या तिघांनी पैशांसाठी महाराजांचा छळ केला. त्यांना पैशांसाठी ब्लॅकमेल केले, असे न्यायमूर्तींनी निकाल देताना म्हटले आहे. तसेच काही सेवकांना भय्यू महाराजांनी त्यांच्या आयुष्यात कुटुंबीयांपेक्षा जास्त महत्व दिले. त्यांच्यावर खूप विश्वास टाकला. आपल्या आश्रमाची आणि कामकाजाची जबाबदारी त्यांच्याकडे सोपवली, त्याच सेवकांनी पैशांसाठी महाराजांचा छळ केला. हा छळ इतका जास्त होता की त्यांना आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले असे न्यायालयाने निकाल सुनावताना म्हटलं आहे.

दरम्यान न्यायालयाने पुराव्यांच्या आधारे तिन्ही आरोपींना केवळ दोषी घोषित केले आहे.परंतु या दोषींना काय शिक्षा मिळणार हा निर्णय न्यायालयाने राखून ठेवला आहे.