नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : पंजाब विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाला मोठे यश मिळाले असून WWE सारख्या इंटरनॅशनल फाईटद्वारे आपली ओळख निर्माण करणारा द ग्रेट खली (The Great Khali) उर्फ दलिप सिंग राणा याने भाजपमध्ये प्रवेश केला आहे. दलिप सिंग राणा याने यापूर्वी पंजाबमध्ये आम आदमी पक्षाच्या प्रचारातही भाग घेतला होता.

WWE सारख्या व्यावसायिक स्पर्धांमध्ये खेळणारा खली त्याची उंची आणि धिप्पाड देहयष्टी यासाठी ओळखला जातो. मात्र, आता हाच दलिप सिंग राणा उर्फ खली पंजाबमध्ये भाजपाकडून प्रचार करताना दिसणार आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी खलीने दिल्लीच्या सीमारेषांवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा दर्शवला होता. त्यानंतर आता त्याने भाजपामध्ये प्रवेश केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. आंदोलक शेतकऱ्यांना पाठिंबा देण्याचे आवाहन देखील खलीने त्यावेळी केले होते.

#WATCH Professional wrestler Dalip Singh Rana, also known as The Great Khali, joins BJP in Delhi pic.twitter.com/BmB7WbpZzx
— ANI (@ANI) February 10, 2022
तसेच मी भाजपामध्ये प्रवेश घेतला याचा मला आनंद होतोय. मला वाटतं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशासाठी केलेल्या कामामुळे ते योग्य पंतप्रधान ठरतात. त्यामुळे मी विचार केला की आपण देशाच्या विकासातील त्यांच्या कामाचा हिस्सा का बनू नये? भाजपाच्या राष्ट्रीय धोरणांमुळे प्रभावित झाल्यामुळे मी भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून भाजपा माझ्यावर जी जबाबदारी देईल ती पूर्ण करण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया खलीने दिली आहे.
दरम्यान २००० साली खलीने त्याच्या रेसलिंग करिअरला सुरुवात केली होती. WWE मध्ये आपल्या कारकिर्दीला सुरुवात करण्याआधी खली पंजाब पोलिसात अधिकारी पदावर कार्यरत होता. त्यानंतर WWE मध्ये त्याने जेतेपदाला देखील गवसणी घातली आहे. खलीने हॉलिवुडमध्ये चार चित्रपटांमध्ये तर बॉलिवुडमध्ये दोन चित्रपटांमध्ये अभिनय देखील केला आहे. २०२१मध्ये खलीचा WWE हॉल ऑफ फेमध्ये समावेश करण्यात आला आहे.