निवडणुकीच्या तोंडावर ईडीकडून ‘या’ राज्यातील मुख्यमंत्र्यांच्या पुतण्याला अटक; ‘हे’ आहे कारण

नवी दिल्ली । भ्रमर वृत्तसेवा : पंजाबचे मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनी याला अंमलबजावणी संचालनालयाने गुरुवारी उशिरा अवैध वाळू उत्खनन प्रकरणात मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली आहे. पंजाबमधील ईडी अधिकाऱ्यांनी सुमारे आठ तासांच्या चौकशीनंतर हनीला प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँडरिंग ॲक्ट (पीएमएलए) अंतर्गत अटक केली.

जालंधरमध्ये ही अटक करण्यात आली असून चन्नी यांचा पुतण्या भूपिंदर सिंग हनीच्या घरावर ईडीने दोन आठवड्यांपूर्वी छापा टाकला होता. त्यावेळी हनीच्या दोन साथीदारांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले. छाप्यावेळी ईडीला तिघांच्या घरातून जप्त झालेल्या रोख रकमेची चौकशी करायची होती. तसेच या छाप्यात हनीच्या घरातून सुमारे ७.९ कोटी रुपयांची रोकड सापडली होती. त्याचवेळी हनीचा सहकारी संदीप कुमार याच्या ठिकाणाहून दोन कोटी रुपये मिळाले होते.तर ईडीच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या झडतीनंतर या छाप्यांत एकूण १० कोटींहून अधिक रोख रक्कम, वाळू खाण व्यवसायासंदर्भातली कागदपत्रे, मालमत्ता व्यवहार, मोबाईल फोन, २१ लाख रुपये किमतीचे सोने आणि १२ लाख रुपयांचे रोलेक्स घड्याळ अशा वस्तू सापडल्या होत्या. त्यानंतर त्या ईडीकडून जप्त करण्यात आल्या आहेत.

दरम्यान या १० कोटींपैकी ७.९ कोटी रुपये भूपिंदरसिंग हनीच्या घरातून जप्त करण्यात आले तर अन्य संशयित संदीप सिंगच्या घरातून २ कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तसेच अंमलबजावणी संचालनालयाच्या तपासात असे समोर आले आहे की भूपिंदर सिंग, कुदरतदीप सिंग आणि संदीप कुमार हे प्रोव्हायडर्स ओव्हरसीज सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेडचे ​​संचालक आहेत. अवैध वाळू उत्खनन रॅकेटच्या आसपास मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली तिघांची चौकशी केली जात आहे. बनावट कंपन्यांचा वापर करून पैसे उकळण्यासाठी आणि अवैध वाळू उत्खनन करण्यात येत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तर या कंपनीची स्थापना ऑक्टोबर २०१८ मध्ये करण्यात आली होती. सहा महिन्यांनंतर, कुदरतदीप सिंह यांच्याविरुद्ध अवैध वाळू उत्खनन प्रकरणात एफआयआर दाखल करण्यात आला. वाळूच्या खाणीचे कंत्राट मिळवण्यासाठी काळा पैसा गुंतवण्यात आल्याचा ईडीला संशय आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!